सोलापूर : गेल्या दीड महिन्यापासून भीषण पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या मंद्रूपकरांसाठी शासनाकडून ४० हजार लिटर क्षमतेचे 3 टँकर मंजूर झाले असून, दररोज दोन खेपा याप्रमाणे दोन लाख चाळीस हजार लिटर पाणी टाकीत आठवण करून नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. सोमवारपासून पाणीपुरवठा सुरळीत होणार असून सोलापूरच्या अंत्रोळी नगर येथून टँकरद्वारे हे पाणी आणले जात आहे.
भीमा नदीतील पाणीसाठाणे दीड महिन्यापासून मंद्रूप लातीवर पाणीटंचाई जाणवत आहे. यावर्षी पाऊस न झाल्याने मंद्रूपमधील अनेक विहिरी व कुपनलिका कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे मंद्रूपकरांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. उजनी धरणातून सोडण्यात आलेले पाणी टाकळीपर्यंत न पोहोचल्यामुळे मंद्रूपचा पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र शासनाकडून टँकर मंजूर होण्यासाठी आठवडाभरापेक्षा अधिक कालावधी गेल्यामुळे मंद्रूप मध्ये लोकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. अखेर रविवारी शासनाकडून मंद्रूपच्या पाणी पुरवठासाठी तीन टॅंकर मिळाल्याने मंद्रूपकराना दिलासा मिळाला आहे. ग्रामपंचायतीने योग्य नियोजन करून सुरळीत पाणीपुरवठा करावा अशी मागणी नागरिकांना होत आहे.
— चौकट ..
“मंद्रूपमधील पाणीटंचाईची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन गटविकास अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला . नागरिकांना पाणी मिळावे यासाठी टँकर मंजुरीसाठी प्रयत्न केले, त्याला आता यश आले आहे. मंद्रूपच्या पाणीटंचाईसाठी सदैव कटिबद्ध आहे. राजकारणांना न करता ग्रामपंचायतीला सहकार्य करणार आहे.
मळसिद्ध मुगळे, सदस्य,
पंचायत समिती , मंद्रूप
…
“आमदार सुभाष देशमुख यांनी प्रशासनाला पत्र पाठवून मंद्रूपसाठी पाच टँकर मंजूर करण्याबाबत पाठपुरावा केला होता. त्यांच्या विशेष प्रयत्नांमुळे आणि शासनाकडे केलेल्या मागणीमुळे तीन टँकर मंजूर झाले आहेत.”
गौरीशंकर मेंडगुदले, संघटन सरचिटणीस , भाजपा, दक्षिण सोलापूर.
….
“लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा व शासनाच्या नियमानुसार मंद्रूपला चाळीस हजार लिटर क्षमतेचे तीन टँकर मंजूर झाले आहेत. दररोज दोन खेपांमधून २ लाख ४० हजार लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. गेल्या आठ दिवसांपासून टँकर मंजुरीसाठी पाठपुरावा सुरू होता. अखेर रविवारी मंद्रूपला तीन टँकर मंजूर झाल्याने सुरळीत पाणीपुरवठा करण्यास मदत होणार आहे.”
प्रवीणकुमार घाडगे, ग्रामपंचायत अधिकारी, मंद्रूप
….





















