सोलापूर : भारतीय जनता पक्षाच्या रेल्वे प्रवासी प्रकोष्ठाच्या प्रदेश कार्यकारिणीत सोलापूरचे सिद्धाराम चाबुकस्वार यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे सोलापूरच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सदर निवडीचे पत्र त्यांना देण्यात आले.
रेल्वे प्रवाशांच्या विविध समस्या, प्रवाशांना भेडसावणाऱ्या अडचणी, रेल्वे सुविधा, नवीन रेल्वे गाड्या, थांबे तसेच प्रवासी हिताच्या प्रश्नांना संघटनात्मक व्यासपीठावरून आवाज देण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी या प्रकोष्ठाच्या माध्यमातून पार पाडली जाते. या पार्श्वभूमीवर प्रदेश कार्यकारिणीत सोलापूरला प्रतिनिधित्व मिळाल्याने स्थानिक रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नांना अधिक प्रभावीपणे मांडण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
याशिवाय संयोजकपदी सुकुमार पाटील (पश्चिम महाराष्ट्र), सहसंयोजकपदी सतीश कल्याणकर (मराठवाडा), उमेश म्हेडकर (विदर्भ), श्यामसुंदर मानधना (सोलापूर), सिद्धार्थ सिरसोडे पाटील (उत्तर महाराष्ट्र), निलेश तेंडुलकर (कोकण) आणि मिलिंद तेलंग (मुंबई) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सिद्धाराम चाबुकस्वार यांच्या निवडीचे सोलापूरमधील भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून स्वागत करण्यात येत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





















