सोलापूर : सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने बालाजी अमाईन्स लिमिटेड आणि एन. एम. वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर शहर व परिसरातील विविध भागांमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत प्रत्येक महिन्यातील दोन रविवारी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत शहर व परिसरातील विविध ठिकाणी आरोग्य शिबिरे आयोजित केली जाणार आहेत.
बालाजी अमाईन्स लिमिटेड व एन. एम. वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने यापूर्वीच शहर परिसरातील शाळांमध्ये सर्व्हयकल कॅन्सरविषयी जनजागृती अभियान तसेच एचपीव्ही (HPV) लसीकरणाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. याच सामाजिक बांधिलकीचा विस्तार म्हणून आता सर्वसामान्य नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचा उपक्रम सुरू करण्यात येत आहे.
या उपक्रमाची सुरुवात रविवार, दिनांक २९ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत देगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुलींच्या शाळेत आयोजित करण्यात येणाऱ्या आरोग्य शिबिराने होणार आहे.
या शिबिरामध्ये नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात येणार असून, त्यांच्या आरोग्यविषयक तक्रारी व गरजांनुसार पुढील उपचारांसाठी आवश्यक वैद्यकीय सल्ला व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. एन. एम. वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टर व प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी यांच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्य तपासणी आणि वैद्यकीय मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
या उपक्रमामुळे सोलापूर शहर व परिसरातील नागरिकांना आपल्या जवळच्या परिसरातच मोफत आरोग्य तपासणी व वैद्यकीय सल्ल्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. या आरोग्य शिबिरांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बालाजी अमाईन्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. राम रेड्डी यांनी केले आहे.





















