वैराग – तालुक्यातील खेडभाळवणी येथे एकता महिला मंचाच्या वतीने भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने गावातील महिलांनी एकत्र येत संविधानाप्रती आपली निष्ठा आणि आदर व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित सर्व महिलांनी एकत्रितपणे भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे (उद्देशिकेचे) सामूहिक वाचन केले.
यावेळी बोलताना मंचाच्या सदस्यांनी सांगितले की, भारतीय संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला समानतेचा, स्वातंत्र्याचा आणि न्यायाचा अधिकार दिला आहे. विशेषतः महिलांना समाजात सन्मानाने जगण्याचा आणि प्रगती करण्याचा हक्क संविधानामुळेच मिळाला आहे. त्यामुळे प्रत्येक महिलेने संविधानातील मूलभूत हक्क आणि कर्तव्यांची जाणीव ठेवून सामाजिक विकासात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एकता महिला मंचाच्या प्रियंका दामोदरे, मीनाक्षी साळुंखे, सुरेखा साळुंखे, कांचन बाबर, स्वाती साळुंखे, प्राजक्ता पवार यांच्यासह गावातील इतर महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन मंचाच्या सदस्यांनी केले.