सोलापूर : हत्तरसंग कुडल या गावाला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळखीबरोबरच मल्लखांब खेळाची ओळख मिळावी आणि हे गाव ‘मल्लखांब गाव’ म्हणून नावारूपाला यावे, अशी अपेक्षा पद्मश्री पुरस्कारप्राप्त मल्लखांब विश्वगुरू उदय देशपांडे यांनी व्यक्त केली.
ड्रीम फाऊंडेशनच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त तसेच संविधान दिन आणि २६/११ मुंबई दहशतवादी हल्ला स्मृतिदिनाचे औचित्य साधून श्री संगमेश्वर प्रशाला, हत्तरसंग येथे विद्यार्थ्यांसाठी मल्लखांब जागृती व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देशपांडे बोलत होते. कार्यक्रमाला ड्रीम फाऊंडेशनचे अध्यक्ष काशिनाथ भतगुणकी उपस्थित होते. प्रशालेचे मुख्याध्यापक सचिन बिराजदार यांनी अध्यक्षस्थान भूषविले. प्रारंभी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी पद्मश्री उदय देशपांडे यांचा प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकात काशिनाथ भतगुणकी यांनी देशपांडे यांच्या मल्लखांब क्षेत्रातील कार्याचा परिचय करून दिला. तसेच संविधान दिनाचे महत्त्व विशद करताना संविधानाने दिलेले अधिकार, कर्तव्ये आणि लोकशाही मूल्यांची माहिती दिली. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना अभिवादनही करण्यात आले.
मार्गदर्शन करताना उदय देशपांडे यांनी मल्लखांब या पारंपरिक भारतीय खेळाचे महत्त्व, त्यातील कौशल्ये आणि क्रीडा क्षेत्रातील संधी यांची माहिती दिली. मल्लखांबासाठी शारीरिक क्षमता, एकाग्रता, शिस्त आणि सातत्य आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या प्रदीर्घ अनुभवातील विविध प्रसंग कथन करत त्यांनी विद्यार्थ्यांना जिद्द, चिकाटी आणि मेहनतीचा मंत्र दिला. पारंपरिक खेळांना प्रोत्साहन मिळाल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी इयत्ता दहावीतील विद्यार्थिनीने संविधान दिन आणि २६/११ हल्ला स्मृतिदिनानिमित्त मनोगत व्यक्त केले. संविधान निर्मितीचा इतिहास, लोकशाहीतील संविधानाचे स्थान तसेच मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे शौर्य आणि बलिदान यावर तिने प्रकाश टाकला.
अध्यक्षीय मनोगतात मुख्याध्यापक सचिन बिराजदार यांनी संविधानातील मूल्ये आत्मसात करण्याचे आवाहन केले. तसेच शहीद जवानांच्या बलिदानाचे स्मरण करून देशाप्रती कर्तव्यनिष्ठ राहण्याचा संदेश विद्यार्थ्यांना दिला.
——
Views: 11