मंगळवेढा – दीपावलीच्या मंगलमय पर्वानिमित्त सालाबादप्रमाणे याहीवर्षी कार्तिकी संकष्टीनिमित्त बाजार चौकातील श्री गणेश मंदिरामध्ये शुक्रवार दि.27 नोव्हेंबर रोजी सायंकाळी शेकडो दिव्यांचा दीपोत्सव मोठया उत्साहात,मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला. सांगली येथील श्री गणपती पंचायतन संंस्थानच्या मंगळवेढा येथील श्री गणेश मंदिरामध्ये श्री गणेश परिवाराच्यावतीने गेल्या 25 वर्षापासून हा दीपोत्सव केला जातो.
पहाटे मंगलमय वातावरणात मंत्रोपचारात श्री गणेश मुर्तीस अभिषेक घालण्यात आला. होमहवन,अथर्वशिर्षपठण झाल्यानंतर ,श्रीं ची आरती करण्यात आली.दीपोत्सव काळात दिवसभर तसेच सायंकाळी असंख्य गणेशभक्तांनी हजेरी लावून श्रीं चे मनोभावे दर्शन घेतले.
सायंकाळी आयोजित केलेल्या भजनसंध्या कार्यक्रमामधून सोलापूरचे भजनरत्न ह.भ.प. पुण्यवंत वाघमारे,पंढरपूरचे ह.भ.प. योगेंद्र महाराज व सहकार्यांनी भक्तीगीते,अभंग,भजने सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली. भजनसंध्या कार्यक्रमाने दिपोत्सवाची रंगत वाढल्याने परिसरातील वातावरण भक्तीमय बनले होते.
श्री गणेशाची भव्य व आकर्षक रंगावली,फटाक्यांची आतषबाजी,पणत्यांची आरास,मंदिर परिसरातील विदयुत रोषणाई ही या दीपोत्सवाची खास वैशिष्ठे आहेत. या दीपोत्सवाच्या माध्यमातून प्रकाश,श्रद्धा आणि भक्तीचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.मंदिर परिसरातील प्रसन्न व मंगलमय वातावरणामुळे भाविकांना आध्यात्मिक आनंदाची अनुभूती मिळाली. सर्वत्र चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते. मंगळवेढेकरांसाठी हा दीपोत्सव विशेष आकर्षण ठरला.
मंदिर परिसरातमध्ये शेख रांगोळी आर्टचे जैनुद्दीन शेख व सहकार्यांनी काढलेली श्री गणेशाची आकर्षक रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. तसेच सौ.देवयानी देशमुख,श्रावणी करमरकर,पुजा करमरकर,श्रावणी मायदेव,मधुरा मायदेव,यश करमरकर,अनिल मेलगे व सहकार्यांनी सुबक रांगोळी काढली होती. यावेळी श्री गणेश विहिरीमध्ये पेंटर सदाशिव जामदार यांनी थर्माकोलच्या सहाय्याने ब्रम्हकमळ साकारले होते.जहाँगीर मुलाणी,मुनीर मुलाणी,असीफ पटेल यांनी आकर्षक विदयुत रोषणाई साकारली होती. सागर देशमाने,भालचंद्र देशमुख,अमोल माने व सहकार्यांनी यासाठी परिश्रम घेतले.
दीपोत्सवाकरीता श्री गणेश परिवाराच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
ओळी – कार्तिक संकष्टीनिमित्त मंगळवेढयातील श्री गणेश मंदिरामधील पणत्यांची आरास तसेच आकर्षक विदयुत रोषणाई, श्री गणेशाची रांगोळी, भजनसंध्या कार्यक्रम, श्री गणेशाची मुर्ती छायाचित्रात दिसत आहे.























