बार्शी – राज्यघटनेने भारतीय नागरिकांना मूलभूत अधिकार बहाल केले असून, स्वातंत्र्य उपभोगण्यात खरा आनंद मिळतो असे प्रतिपादन राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. पंडित लावंड यांनी केले.
येथील श्री शिवाजी महाविद्यालयात ‘संविधान दिना’निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अब्दुल शेख होते.
याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. रवींद्र वायकर, विज्ञान शाखा समन्वयक डॉ. शशिकांत गायकवाड, डॉ. वसिष्ठ गुरमे, डॉ. दीपक जाधवर आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. लावंड म्हणाले की, भारताने १९९१ साली समाजवादी संकल्पनेचा त्याग केला असला, तरी सद्यःस्थितीत आर्थिक आणि सामाजिक समतेची नितांत गरज आहे. तसेच, धर्माचा आधार घेऊन सामाजिक जीवनात भेदभाव करणे, हे धर्मनिरपेक्ष तत्त्वाला छेद देणारे आहे. सध्याचे राजकीय वातावरण पाहता भारतातील लोकशाही टिकवणे जिकिरीचे बनत चालले असून, त्यासाठी सकारात्मक राजकीय भूमिका घ्यावी लागणार आहे असे ही त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. शेख म्हणाले की, निवडणुकीमध्ये होणाऱ्या वारेमाप पैशांच्या खर्चामुळे भारतीय लोकशाहीसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. आपल्या देशातील लोकशाही टिकवण्यासाठी सर्वांनीच पुढे आले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार डॉ. शशिकांत शिंदे यांनी मानले.
Views: 5