सांगोला – सोलापूर जिल्ह्याची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी जवळा ता.सांगोला येथील सूर्यादित्य उर्फ यशराजे दिपकआबा साळुंखे पाटील यांची वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी भरघोस मतांनी निवड झाली आहे. यापूर्वी त्यांचे आजोबा स्व.आ.काकासाहेब साळुंखे पाटील यांनी १० वर्षे तर वडील माजी आ.दिपकआबा साळुंखे पाटील यांनी १८ वर्षे बँकेत संचालक म्हणून काम पाहिले आहे. त्यांच्या या विजयामुळे साळुंखे पाटील परिवारावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून कार्यकर्त्यांमधून विजय उत्सव साजरा केला जात आहे.
या निवडणुकीत दूध संस्था व व्यक्ती सभासद मतदारसंघातून ३०५ मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला यापैकी ३ मते अवैध ठरली उर्वरित ३०२ पैकी सूर्यादित्य साळुंखे पाटील यांनी विक्रमी १९४ मते मिळवली तर त्यांच्या विरोधात असणाऱ्या उमेदवारास केवळ १०८ मते मिळाली. दरम्यान, सूर्यादित्य साळुंखे पाटील यांचे शुक्रवारी साळुंखे पाटील परिवारावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी सांगोला शहरात जोरदार स्वागत करत फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करून विजयाचा आनंद साजरा केला तर जवळा येथे जंगी मिरवणूक काढून त्यांचे स्वागत करण्यात आले.
चौकट-
सभासदांच्या विश्वासाला तडा जाणार नाही
पालकमंत्री जयकुमार गोरे तसेच भारतीय जनता पार्टी व मित्रपक्ष पुरस्कृत सहकार विकास पॅनलचे सर्वच नेतेमंडळीनी माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून मला जिल्हा बँकेत काम करण्याची संधी दिली. तसेच दूध उत्पादक संस्था व व्यक्ती सभासद मतदारसंघातील मतदारांनी माझ्यावर विश्वास दर्शवला त्याबद्दल सर्व नेतेमंडळी, मतदारांचे तसेच माझ्यावर व माझ्या परिवारावर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांच्या विश्वासाला तडा जाणार नाही अशा पद्धतीचे काम येणाऱ्या काळात बँकेचा संचालक म्हणून पार पाडेन
-सूर्यादित्य साळुंखे पाटील, नूतन संचालक