बार्शी – बार्शी शहरातील अलीपूर रोडवरील माऊली चौक येथे गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात चंदीगड येथील १८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. विकी कुमार असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दि. २६ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्यापूर्वी माऊली चौक येथे दोन मोटारसायकलींची जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, अपघातातील एका दुचाकीचे दोन तुकडे झाल्याचे समजते. अपघाताचा मोठा आवाज ऐकून परिसरातील नागरिक घराबाहेर आले. त्यानंतर जखमींना तातडीने मदत करण्यासाठी धावपळ सुरु झाली. या अपघातात विकी कुमार (वय १८, रा. घलोमछ्चर, चंदीगड) हा तरुण गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी जगदाळे मामा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दुसऱ्या दुचाकीवरील अंधारे नामक व्यक्तीही गंभीर जखमी झाला असून, तो एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. मृत विकी कुमार हा बार्शी शहरातील एका हॉटेलमध्ये कामगार म्हणून काम करत होता. हॉटेलमधील काम आटोपून घरी जात असताना त्याच्यावर काळाने घाला घातल्याचे समजते. या घटनेची माहिती जगदाळे मामा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यास लेखी पत्राद्वारे दिली. त्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली आहे.
Views: 7