नागपूर-पुणे इंडिगो विमानाच्या पायलटचा आज, गुरुवारी संध्याकाळा नागपूर विमानतळावर मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. कॅप्टन मनोज सुब्रमण्यम असे या वैमानिकाचे नाव आहे. विमानात जाण्यापूर्वीच ते विमानतळाच्या बोर्डिंग गेटवर कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला.
यासंदर्भातील माहितीनुसार इंडिगो कंपनीचे विमान गुरुवारी संध्याकाळी नागपूरहून पुण्यासाठी उड्डाण घेणार होते. त्यासाठी वैमानिक कॅप्टन मनोज हे निघाले असताना बोर्डिंग गेटजवळ अचानक कोसळले. विमानतळावरील ग्राउंड स्टाफच्या मदतीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. मृत्यूचे प्राथमिक कारण कार्डियाक अरेस्ट (हृदय विकाराचा धक्का) असल्याचा अंदाज आहे. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
या घटनेनंतर विमान कंपनी इंडिगोने निवेदन जारी केले आहे. त्यानुसार पायलटच्या रोस्टरनुसार, ड्युटीवर येण्यापूर्वी कॅप्टन मनोज यांनी विविध क्षेत्रात विमानांचे उड्डाण केले. त्याशिवाय 27 तासांची विश्रांतीही घेतली. पायलटने काल, त्रिवेंद्रम-पुणे-नागपूर असे दोन सेक्टर चालवले. पहाटेच्या (अंदाजे पहाटे 3 ते सकाळी 7 दरम्यान) सुमारास विमानाचे सारथ्य केले. त्यानंतर कॅप्टन मनोज यांनी 27 तास विश्रांती घेतली. त्यानंतर आज 4 सेक्टरसाठी दुपारी 1 वाजता प्रस्थान केले. नागपूरहून प्रस्थान होते. त्यांचे हे विश्रातीनंतरचे पहिले सेक्टर होते, अशी माहिती ‘इंडिगो’च्यावतीने देण्यात आली आहे. वैमानिकांचे काम हे अतिशय कौशल्याचे काम असते. त्यांच्यावर कामामुळे येणारा ताण दूर करण्यासाठी विमान कंपनीकडून त्यांना आराम करण्यासाठी पुरेसा वेळ दिला जात असल्याचे इंडिगोच्या निवेदनात नमूद करण्यात आलेय.