अकलूज : इन्स्टाग्राम आयडीवरून एका तरुणाला टॅग करून मैत्रीचा स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका २१ वर्षीय तरुणाला शिवीगाळ व दमदाटी करून कोयत्याने वार केल्याची घटना यशवंतनगर येथे घडली. या प्रकरणी अकलूज पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अकलूज पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रेम मारुती बोडरे (वय २१, रा. गांधी चौक, पेट्रोल पंपाच्या पाठीमागे, १०७० झोपडपट्टी, अकलूज) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. त्यानुसार सौरभ खंडागळे (वय २३, रा. कीर्ती नगर, यशवंतनगर), निखिल शिंदे उर्फ चिकण्या (वय ३४, रा. कीर्ती नगर, यशवंतनगर) आणि रोहित उर्फ भिलेचा बबल्या (वय २२, पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस तक्रारीनुसार, ५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.४५ वाजण्याच्या सुमारास यशवंतनगर येथील मारुती मंदिराच्या पाठीमागे, आर्यन सरक यांच्या टपरीजवळ हा प्रकार घडला. फिर्यादीने आपल्या इन्स्टाग्राम आयडीवरून यश चव्हाण याला टॅग करून मैत्रीचा स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून आरोपींनी त्याला शिवीगाळ व दमदाटी केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
तक्रारीनुसार, यावेळी लहु धनवडे याला चापट मारण्यात आली. त्यानंतर सौरभ खंडागळे याने फिर्यादीला गचांडीला धरल्याचे, तर रोहित उर्फ भिलेचा बबल्या याने मागून पकडून ओढत नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्याचवेळी निखिल शिंदे उर्फ चिकण्या याने कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यात व हातावर वार करून गंभीर जखमी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचेही फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे.
या तक्रारीवरून अकलूज पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०९(१), ११५(२), ३(५), ३५१(२) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील तिन्ही आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
पोलिस निरीक्षक नीरज उबाळे यांच्या आदेशाने या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीक्षित करीत आहेत. गुन्ह्याचा वर्दी अहवाल माळशिरस न्यायालयात पाठविण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.