आटपाडी – अतिक्रमणाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष समर्थन देणाऱ्या आणि अतिक्रमण काढण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या अधिकारी, पदाधिकाऱ्यांवर बडतर्फीची कठोर कारवाई करा . अशी मागणी सादिक खाटीक यांनी केली आहे .
आटपाडी शहरातील सर्व अतिक्रमणे काढावीत अधिकारी पदाधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, व इतर मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे सांगली जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात व त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी तहसील कार्यालय आटपाडी समोर बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले आहे . त्याला पाठींबा देत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राज्याचे नेते सादिक खाटीक यांनी ही मागणी केली .
आटपाडी तलावापासून आटपाडीकडे झेपावणारे दोन्ही ओढ्यांची पात्र अतिक्रमणांनी वेढली गेली आहेत . गावच्या संरक्षणासाठी बांधलेल्या संरक्षक तटाच्या ७ फुटी भिंतीला ओलांडून अनेकांनी ओढापात्रात अतिक्रमण केले आहे . वास्ताविक या भिंतीच्या आत दारे, चौकटी, खिडक्या लावता येतात . परंतु ही ७ फुट भिंतीची जागा आपल्या इमारतीखाली दाबून अनेक पठ्यांनी ओढ्यातील अमर्याद जागा ताब्यात घेतली आहे . असाच प्रकार आटपाडी शहराच्या पुर्वेला असणाऱ्या संरक्षक भिंतीला नेस्तनाबूत करून अनेकांनी भिंतीबाहेर दहा दहा फुट अतिक्रमण करीत आपली जंगी दुकाने, घरे, व्यवसाय थाटले आहेत . याचीही तातडीने दखल घेत कृतीशील कारवाई केली गेली पाहिजे .
अनेक राजकीय नेत्यांच्या समर्थकांनी, कार्यकर्त्यांनी दोन्ही ओढे संपविण्याचा घाट घातला आहे . आटपाडी बाजार पटांगण ओढा पात्राच्या जवळून धांडोरओढ्याकडे जाणाऱ्या आटपाडी – दिघंची रस्त्याच्या दुतर्फा शासकीय जमिनीवर मोठ्या प्रमाणात मोठ मोठाल्या सिमेंट काँक्रीटच्या इमारती बांधून, बोगस कागद पत्रांद्वारे आपल्याकडे रितसर मालकी असल्याचा फार्स अनेक जण करीत आहेत . मुळ जमीन शासनाची असेल तर यांना शासनाने ती जमीन रितसर विकली का ? किंवा शासनाने बक्षीसपत्र, दानपत्र करून दिले का ? हे तपासले गेले पाहिजे . शासकीय जमिनीवर ७ / १२ ला अथवा ग्रामपंचायत रेकॉर्डला एखाद्याचे बोगस नाव चढवायचे आणि अशांकडून खरेदीपत्र करून घेत आम्ही रितसर मालक असल्याचा कांगावा करणाऱ्यांचा जुन्या रेकॉर्डच्या आधारे पर्दापाश करीत ही पण अतिक्रमणे नेस्तनाबूत केली पाहिजेत .
देवस्थान इनाम वर्ग – ३ च्या जमिनीला रयतावा दाखवून खरेदी दस्त करत अंदाजे १०० कोटी रुपये किंमतीच्या जागेवरील बेकायदेशीर साम्राज्यही उखडले गेले पाहिजे . राज्य शासनाने सदरची देवस्थान इनाम वर्ग – ३ ची जमीन विकण्यास रितसर परवानगी दिली होती का ? हे तपासल्यास सर्व बोगस व्यवहार समोर येवू शकतो . ही देवस्थान इनाम वर्ग – ३ ची सर्व जागा शासनाने तातडीने ताब्यात घेऊन या ठिकाणी व शासनाच्या अतिक्रमणीत जागेवरील अतिक्रमणे हटवून , खोक्यांमधून व्यवसाय करणाऱ्या सर्वांना, या सर्व ठिकाणी दुकाने लावण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी . किमान २०० व्यावसायिकांना या सर्व ठिकाणी नवव्यवस्था होऊ शकते . यादृष्टीने शासनाने तातडीने पावले टाकावीत .
जुन्या ग्रामपंचायत इमारती मागील मारुती मंदिरांच्या पायऱ्याही महापुराच्या पाण्याखाली जात असत . मग महापुराची रेषा निम्म्या ओढा पात्रात कशी दाखविली जाते . हे ही अभ्यासले गेले पाहिजे . जुन्या ग्रामपंचायत इमारतीच्या अर्थात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या मागील आताच्या नगरपंचायतीचा एक भाग असलेल्या इमारतीच्या पूर्व – पश्चिम मरीमाता मंदीर ते उत्तरेश्वर मंदिर लगतच्या सर्व दुकानांचे गाळे महापुर पाणी रेषेत येतात का ? याचीही पारदर्शी चिकित्सा होणे न्यायाचे ठरते . बाजारतळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागातल्या सर्व इमारती, दुकाने हे ही नियमाच्या चौकटीत बसतात का ? यावर ही शासनाने निःष्पक्षपाती पणे मुल्यमापन करणे सर्वांच्या हिताचे होणार आहे .
आज अखेर झालेल्या सर्व अतिक्रमणांना अप्रत्यक्ष – प्रत्यक्ष साथ – समर्थन देणाऱ्या सर्व अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना शासनाने तातडीने बडतर्फ करून त्यांच्यावर कारवाई करावी. याचा पुनर्रुच्चार सादिक खाटीक यांनी यावेळी केला .
आटपाडी शहरातील, ओढा पात्रातील, शासकीय जागा, देवस्थान इनाम वर्ग – ३ च्या जागेवरील अतिक्रमणे तातडीने काढावीत यासाठी सांगली जिल्ह्यातील आणि उर्वरीत महाराष्ट्रातील आमदार, खासदार यांनी विधीमंडळ आणि संसदेत जोरदार आवाज उठवावा असे आवाहनही सादिक खाटीक यांनी केले आहे .
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...





















