
श्रीपूर – जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर शेतकरी कुटुंबातील रोहन शंकर शिंदे यांनी चार्टर्ड अकाउंटंट (सीए) बनण्याचे स्वप्न साकार केले आहे. अकलूजजवळील आनंदनगर-पाटीलवस्ती येथील रहिवासी असलेल्या रोहन यांनी मे २०२६ मध्ये झालेल्या सीए फायनल परीक्षेत यश मिळवत आपल्या कुटुंबासह परिसराचे नाव उज्ज्वल केले आहे.
शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या रोहन यांनी आर्थिक आणि शैक्षणिक आव्हानांवर मात करत आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांनी अकलूज येथील शंकरराव मोहिते पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेतले. दहावीत ९४ टक्के तर बारावीत ८९ टक्के गुण मिळवून त्यांनी शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली.
त्यानंतर पुण्यातील मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स, डेक्कन येथे उच्च शिक्षण घेत असताना त्यांनी सीए अभ्यासक्रमाची वाट निवडली. मार्च २०२१ मध्ये सीए फाउंडेशन, मे २०२३ मध्ये सीए इंटरमिजिएट आणि अखेर मे २०२६ मध्ये सीए फायनल परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांनी चार्टर्ड अकाउंटंट होण्याचे ध्येय पूर्ण केले. सीए फायनल परीक्षेत त्यांनी ६०० पैकी ३२१ गुण मिळविले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरलेल्या रोहन यांच्या यशामुळे आनंदनगर परिसरात आनंदाचे वातावरण आहे. शेतकऱ्याच्या मुलाने कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर देशातील कठीण समजली जाणारी परीक्षा उत्तीर्ण करून यशाचे शिखर गाठल्याने सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.
“शेतकऱ्याच्या मुलाचा सीएपर्यंतचा प्रवास हा ग्रामीण भागातील युवकांसाठी प्रेरणादायी ठरावा,” अशी भावना क्षितिज फायनान्शिअल सर्विसचे मालक अजित वीर व्यक्त केली




















