सोलापूर : साखर पेठेतील लखपती हनुमान मंदिराजवळील श्री गणेश बाल तरुण मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त उज्जैन येथील भगवान महाकाल मंदिराची व गाभाऱ्याची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे. धार्मिक वातावरण, मंदिराची रचना आणि गाभाऱ्याची मांडणी यामुळे हा देखावा भाविकांचे विशेष आकर्षण ठरत असून, देखावा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.
श्री गणेश बाल तरुण मंडळाची स्थापना १९६९ मध्ये झाली. तत्कालीन कार्यकर्ते प्रकाश बाबानगरे, राचप्पा व्हसकेरी, हरि कालानी, श्रीकांत कालानी, सतीश बिद्री, बुलबुले, राजू मरगूर आदींच्या पुढाकाराने सुरू झालेला हा गणेशोत्सवाचा प्रवास आज ५७ वर्षांनंतरही अखंडितपणे सुरू आहे. रविंद्र दिड्डी व सोमशेखर स्वामी यांचे प्रमुख मार्गदर्शन मंडळाला लाभले आहे.
मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे स्थापनेपासूनच दरवर्षी हलता देखावा सादर करण्याची परंपरा जपण्यात आली आहे. गोरा कुंभार, भक्त मार्कंडेय, संत ज्ञानेश्वर, गणेशाची पृथ्वी प्रदक्षिणा अशा विविध धार्मिक व सामाजिक आशयाच्या देखाव्यांमधून मंडळाने गणेशोत्सवात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. उत्कृष्ट देखावा आणि शिस्तबद्ध मंडळ म्हणून तत्कालीन पोलीस आयुक्तांकडून मंडळाला प्रथम पारितोषिकही मिळाले होते. या पुरस्काराचे वितरण तत्कालीन महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले होते.
गणेशोत्सवाबरोबरच मंडळाकडून दरवर्षी विविध सामाजिक, सांस्कृतिक व पर्यावरणपूरक उपक्रम राबविले जातात. झाडे लावणे, अथर्वशीर्ष पठण, मुलांसाठी व महिलांसाठी संगीत खुर्ची, लिंबू-चमचा, लांब उडी, स्लो सायकल, पुस्तक वाचन, सुबक रांगोळी, अंताक्षरी अशा विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते.
विशेष म्हणजे मंडळाची शासनाच्या धर्मादाय विभागाकडे रीतसर नोंदणी असून, मंडळाकडून कोणत्याही व्यापारी अथवा राजकीय नेत्यांकडून वर्गणी घेतली जात नसल्याचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. नव्या पिढीतील विकी गदाळे, सुमित कालानी, पवन रणसुबे, श्रीगिरी बंधू, राजू तोळनूर, विशाल गदाळे, ज्ञानेश्वर, सागर कालानी, पवन कालानी, धनराज गिडवीर, आनंद तोळनूर, विनायक यरगल, बुरबुरे, रापर्ती, सिकंदर तगाला आदी तरुण कार्यकर्ते मंडळाच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत आहेत.
मागील काही वर्षांपासून मंडळाकडून बाबा अमरनाथ गुंफा, माता वैष्णोदेवी यांसारख्या प्रसिद्ध धार्मिक स्थळांचे आकर्षक देखावे साकारण्यात आले आहेत. हे देखावे पाहण्यासाठी दरवर्षी हजारो भाविकांची गर्दी होते. गर्दीच्या पार्श्वभूमीवर मंडळाकडून पर्यावरण, स्वच्छता आणि ध्वनी प्रदूषणाबाबत जनजागृती करणारे माहितीपर फलकही लावण्यात येतात. तसेच भाविकांच्या गर्दीचे शिस्तबद्ध नियोजन करण्यावर मंडळाचा भर असतो.
उज्जैनच्या धर्तीवर भस्म आरतीचे आयोजन
यंदाच्या देखाव्याचे विशेष आकर्षण म्हणजे उज्जैन येथील भगवान महाकाल मंदिराची हुबेहूब प्रतिकृती. ही प्रतिकृती साकारण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मागील वर्षभरात तब्बल १० ते १५ वेळा उज्जैनला भेट देऊन मंदिराची रचना, गाभारा आणि विविध बारकाव्यांची पाहणी केली. त्यानंतर त्याच धर्तीवर सोलापुरात देखावा उभारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
भाविकांना उज्जैनच्या धार्मिक परंपरेचा अनुभव सोलापुरात मिळावा, यासाठी विशेष धार्मिक उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. उज्जैन येथील मंदिरातील पुजाऱ्यांच्या उपस्थितीत भस्म आरतीचे आयोजन करण्यात येणार असून, भाविकांना महाकाल मंदिराच्या धर्तीवर कपाळावर महाकालचा गंध लावण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
देखावा सुरू झाल्यापासून भाविकांची मोठी गर्दी होत असून, आगामी दिवसांत गर्दी आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाविकांनी गर्दीचा वाढता ताण टाळण्यासाठी आतापासूनच उज्जैन महाकाल मंदिराचा हा देखावा पाहण्यासाठी साखर पेठेत यावे, असे आवाहन मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व मार्गदर्शक राजेश दिड्डी यांनी केले आहे.
—
Post Views: 9