सोलापूर : परीक्षेचा पेपर देण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी नवी मुंबई येथील तरूणास येथील विशेष न्यायाधीश अजितकुमार भस्मे यांनी १० वर्षे सक्तमजुरी व १५०० रुपये दंडाची शिक्षा आज रोजी सुनावली.
व्यंकटेश नरसप्पा गुड्डी (रा. सी बी डी बेलापूर, नवी मुंबई) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पिडीतेच्या आईच्या फिर्यादीवरुन जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यातील पिडीता ऑक्टोबर २०१७ मध्ये तिच्या मावशीच्या घरी सी बी डी, बेलापूर नवी मुंबई येथे गेली होती. त्यावेळी पिडीतेच्या मावशीच्या घराजवळ राहणाऱ्या एका महिलेच्या ओळखीने पिडीता ही एका वयोवृध्द महिलेला सांभाळण्याचे काम करायची. त्यामुळे पिडीता आणि मावशीच्या घराजवळ राहणाऱ्या महिलेचा दीर व्यंकटेश गुड्डी यांच्यात ओळख होऊन त्यांच्यात मैत्री निर्माण झाली होते. ही बाब पिडीतेच्या आईला कळाल्यानंतर तिने नोव्हेंबर २०१७ मध्ये पिडीतेला सोलापूरात परत आणले होते. ९ मार्च २०१८ रोजी पिडीता ही कॉलेजमध्ये पेपर देण्यासाठी गेल्यानंतर ती परत घरी आलीच नाही. त्यामुळे पिडीतेच्या आईने सगळीकडे शोध घेऊन, ती मिळून न आल्याने याबाबत जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. जोडभावी पेठ पोलीसांनी तपास करून पिडीता व तिला पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या व्यंकटेश गुड्डी यास ताब्यात घेऊन सोलापूरात आणले, व्यंकटेश गुड्डी यास पोलीसांनी पोक्सोच्या गुन्ह्यात अटक करून पोलीस निरीक्षक बी एच पाटील यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
या खटल्याची सुनावणी विशेष न्यायाधीश भस्मे यांच्यासमोर झाली. सरकारच्यावतीने १० साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये पिडीता, डॉक्टर फिर्यादी यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. सरकारी पश्नाकडून करण्यात आलेला युक्तीवाद ग्राह्य धरून विशेष न्यायाधीश भस्मे यांनी आरोपी व्यंकटेश गुड्डी यास १० वर्षे सक्तमजुरी व १५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
या खटल्यात सरकारच्यावतीने ॲड. शीतल डोके यांनी तर आरोपीच्यावतीने ॲड. आर एल तळ्ळीकर यांनी काम पाहिले.