तरुण भारत फ्लॅश पैठण प्रतिनिधी मंगलसिंग भवरे :- संत ज्ञानेश्वर महाराज यांनी रेड्यामुखी वेद वदवलेल्या दक्षिण काशी पैठण नगरीतील प्राचीन नागघाट ठिकाणी रात्रीच्या वेळी काही युवकांनी अनेक ड्रोन कॅमेरा उडवल्याची घटना ताजी असतांना दिनांक २५ जून मंगळवार रोजी रात्री ९ ते २ वाजेच्या दरम्यान जायकवाडी धरणावर जवळपास ६ ड्रोन कॅमेरांनी घिरट्या घातल्याची तक्रार जायकवाडी धरण प्रशासनाने पैठण पोलिसांत केली आहे.
दिनांक १६ जून रविवार रोजी रात्री १० वाजेच्या दरम्यान गोदावरी तीरावरील प्राचीन नागघाटावर अनोळखी युवकांनी अनेक ड्रोन कॅमेरे उडवले असल्याने येथील स्थानिक लोकांनी त्याठिकाणी धाव घेतली असता ड्रोन उडवणाऱ्या युवकांनी कॅमेरे खाली घेऊन तेथून निघून गेले. परंतू आता १० दिवसांच्या फरकाने याच पद्धतीने नाथसागर धरणावर रात्रीच्या वेळी जवळपास ५ तास ड्रोन कॅमेरे उडत असलेल्या घटनेने धरणाच्या सुरक्षितेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रतिबंधित क्षेत्रात ड्रोन उडणारे लोक कोण. नेमका त्यांचा उद्देश काय.याबाबत धरणाचे अभियंता विजय काकडे यांनी पैठण पोलिसात तक्रार केली असून पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ड्रोन उडवनाऱ्याचा शोध घेतला जात आहे.