सोलापूर – दिनांक १४ मे २०२६ पासून आपण राज्यव्यापी आंदोलनास प्रारंभ करीत आहोत. आपल्या जिव्हाळ्याचे व अत्यंत महत्त्वाचे प्रश्न अनेक महिन्यांपासून वित्त विभागाकडे प्रलंबित आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही वित्त विभागाला जाग येत नसल्याचे दुर्दैवी चित्र आज दिसून येत आहे. ज्या पालक विभागाच्या अधिपत्याखाली आपण कार्यरत आहोत, तो विभागदेखील हे प्रश्न मार्गी लावण्यात असमर्थ ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आपल्या न्याय्य व हक्काच्या मागण्यांसाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे.
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगांतर्गत लागू असलेल्या सुविधा मिळतात; मात्र त्याच सुविधा मिळविण्यासाठी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रत्येक वेळी संघर्ष करावा लागतो, ही अत्यंत वेदनादायी वस्तुस्थिती आहे. शासनाच्या या सख्ख्या-सावत्र भूमिकेचा आम्ही तीव्र निषेध करीत आहोत.
वाढती महागाई, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि आर्थिक ताण यांचा ताळमेळ साधताना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना किती मोठी कसरत करावी लागते, याची जाणीव मंत्रालयातील अधिकाऱ्यांना नसावी, असेच दुर्दैवाने वाटते. आपल्या प्रामाणिक सेवेला न्याय मिळावा, कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक स्थैर्य मिळावे आणि समान न्यायाच्या तत्त्वानुसार शासनाने निर्णय घ्यावा, हीच आपल्या आंदोलनामागील प्रमुख भावना आहे.
दिनांक १४ मे २०२६ पासून सुरू होत असलेल्या राज्यव्यापी आंदोलनात सर्व विद्यापीठे व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे कळकळीचे आवाहन करण्यात येत आहे. हा संघर्ष केवळ काही मागण्यांसाठी नसून आपल्या हक्कासाठी, स्वाभिमानासाठी आणि आपल्या कुटुंबाच्या भविष्यासाठी आहे.
आज आपण एकजुटीने उभे राहिलो, तरच शासनाला आपल्या प्रश्नांची गंभीर दखल घ्यावी लागेल. प्रत्येक कर्मचाऱ्याचा सहभाग हा आंदोलनाची ताकद वाढविणारा ठरणार आहे. त्यामुळे संघटनेच्या हाकेला प्रतिसाद देत सर्वांनी एकदिलाने, शिस्तबद्ध व शांततेच्या मार्गाने आंदोलनात सहभागी व्हावे.आपला हक्क मिळवायचा असेल, तर संघर्ष अटळ आहे आणि संघर्ष यशस्वी करायचा असेल, तर एकजूट आवश्यक आहे. आपल्या न्याय्य हक्कांसाठी एकत्र येऊया आणि आंदोलन यशस्वी करूया.
यासाठी सोलापूर विभागातील सर्व महाविद्यालय व विद्यापीठ शिक्षकेतर सेवक आंदोलनात सहभागी होणार आहेत असे श्री.राजाराम तायाप्पा माने.संघटक. श्री.भीमा भिका मस्के.अध्यक्ष. अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघ सोलापुर विभाग सोलापूर व सेवक संयुक्त कृती समिती पदाधिकारी यांनी आवाहन करण्यात आले…
























