सोलापूर – ग्रामीण भागात वाढत चाललेल्या बोगस डॉक्टरांच्या जाळ्यावर आता जिल्हा परिषद प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतली असून, जिल्हास्तरीय समितीच्या धर्तीवर तालुका स्तरावर स्वतंत्र आणि अधिक प्रभावी समित्या स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष दिपक वैद्य यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली.
ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या बोगस डॉक्टरांविरोधात आता केवळ कागदी आदेश नव्हे, तर प्रत्यक्ष शोधमोहीम राबविली जाणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत. महाराष्ट्र वैद्यकीय व्यावसायिक अधिनियम १९६१ अंतर्गत अशा अनधिकृत वैद्यकीय व्यवसायावर कारवाई करण्याचे स्पष्ट अधिकार प्रशासनाला असून, त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाला अधिक सक्रिय केले जात असल्याचे वैद्य यांनी स्पष्ट केले.
विशेष म्हणजे, एखाद्या गावात बोगस डॉक्टर कार्यरत असल्याचा संशय आल्यास नागरिकांना तात्काळ तक्रार नोंदविता यावी यासाठी मोबाईल अॅप आणि ‘संवाद सेतू’ प्रणालीशी ही मोहीम जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कोणतीही तक्रार दडपली जाणार नाही किंवा गायब होणार नाही, असा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनी पुढे येऊन माहिती द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
या मोहिमेसाठी स्वतंत्र विशेष पथक तयार करण्यात आले असून त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी, आरोग्य विस्तार अधिकारी, औषध निर्माण अधिकारी, सहाय्यक कर्मचारी, बीट अंमलदार, पोलीस पथक तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाच्या प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक अधिकाऱ्यावर स्वतंत्र जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या असून तालुकास्तरावर नियमित तपासणी आणि छापेमारी मोहीम राबविण्यात येणार आहे.
अलीकडील काही घटनांमुळे ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेषतः कथित बंगाली डॉक्टर, अपात्र कंपाउंडर आणि बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे सुरू असलेले दवाखाने प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरत आहेत. याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्रशासनाने आता ‘शोधा आणि कारवाई करा’ ही भूमिका स्वीकारल्याचे दिसून येत आहे.
एकीकडे ग्रामीण भागात तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता आणि दुसरीकडे बोगस डॉक्टरांचा वाढता सुळसुळाट, या दुहेरी संकटामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. त्यामुळे प्रशासनाची ही मोहीम केवळ घोषणांपुरती मर्यादित न राहता प्रत्यक्षात कितपत प्रभावी ठरते, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
कोणतीही अनियमितता आढळल्यास तत्काळ कारवाई
बोगस डॉक्टरांविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्याचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांनी दिले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर “तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित व्यक्तीची कागदपत्रे, परवाने आणि वैद्यकीय पात्रता तपासली जाईल. कोणतीही अनियमितता आढळल्यास तत्काळ कारवाई केली जाईल,” असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड यांनीही स्पष्ट केले.
प्रत्यक्षात प्रभावी कारवाई होणार का
जिल्हा परिषद अध्यक्ष दिपक वैद्य यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेत कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. “ग्रामीण जनतेच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही माफी नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.तथापि, प्रत्येक दुर्घटनेनंतर प्रशासन जागे होते आणि काही दिवसांनी पुन्हा परिस्थिती जैसे थे होते, अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. त्यामुळे बोगस डॉक्टरांविरोधातील मोहीम केवळ बैठका आणि आदेशांपुरती मर्यादित न राहता प्रत्यक्षात प्रभावी कारवाई होणार का, हा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेसमोर उभा राहिला आहे.
























