सोलापूर – दि. 26 ते 31 डिसेंबर 2025 रोजी भुवनेश्वर, ओडिसा येथे होणाऱ्या 19व्या राष्ट्रीय सब-ज्युनिअर सॉफ्ट टेनिस स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या मुलांच्या व मुलींच्या संघाची निवड झाली आहे. या संघात निर्मलाताई ठोकळ प्रशालेचा कुशल खेळाडू अजिंक्य वसपटे याची निवड झाल्याची आनंददायी माहिती मिळाली आहे.
महाराष्ट्र राज्य सॉफ्ट टेनिस असोसिएशन व सॉफ्ट टेनिस बुलढाणा असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने दि. 21 डिसेंबर 2025 रोजी मलकापूर येथे घेण्यात आलेल्या निवड चाचणीतून अजिंक्यची निवड करण्यात आली.
सन 2024-2025 मध्ये पंजाब येथे झालेल्या 18व्या राष्ट्रीय सब-ज्युनिअर सॉफ्ट टेनिस स्पर्धेत देखील अजिंक्यने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते. मागील पाच वर्षांपासून तो सॉफ्ट टेनिसचा नियमित सराव करत आहे. बारामती येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय स्पर्धेत 17 वर्षाखालील गटात कांस्यपदक पटकावून त्याने उल्लेखनीय यश मिळवले.
अजिंक्यला सोलापूर टेनिस असोसिएशनचे सचिव श्री. संतोष गवळी यांच्या नेतृत्वाखाली श्री. सुधीर सालगुडे, श्री. महेश झांबरे, श्री. बालाजी केदार, श्री. चंद्रकांत वाघमोडे, श्री. प्रशांत केदार तसेच शाळेचे क्रीडा मार्गदर्शक श्री. अर्जुन सुरवसे यांचे मार्गदर्शन लाभले.
अजिंक्यच्या या उत्तुंग यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. विपिन ठोकळ, उपाध्यक्ष श्री. सचिन ठोकळ, सचिव श्री. भिकाजी गाजरे, संचालिका शिल्पाताई ठोकळ व प्राचार्य श्री. डी. गाजरे यांनी अभिनंदन करून भुवनेश्वर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.


















