सोलापूर – ए. जी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, म्हणून अभ्यासक्रमासोबतच अभ्यासक्रमपूरक तसेच अभ्यासेतर असे अनेक उपक्रम राबविले जातात. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी “अभियुवा” हा कार्यक्रम उपक्रम राबविण्यात आला. “अभियुवा” हे एक सांस्कृतिक, कला गुणांना वाव देणारे एक समृद्ध व्यासपीठ आहे.
”अभियुवा”चे आयोजन महाविद्यालयाचे सांस्कृतिक मंडळ करत असते. याही वर्षी सांस्कृतिक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. पाटील प्रियंका आणि त्यांच्या टीमने अतिशय नियोजनबद्ध कार्यक्रमाची आखणी केली. “अभियुवा” हा उपक्रम तीन दिवस चालला. प्रथम दिनी मेहंदी, रांगोळी, मिसमॅच डे, ट्विन्स डे इ. स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये मेहंदी, रांगोळी या मुलींचे वर्चस्व असणाऱ्या क्षेत्रात मुलांनीही आपला सहभाग नोंदविला व कला सादर केली. ट्विन्स डे, मिसमॅच डे मध्ये जवळजवळ १०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. नाविन्यपूर्ण वेशभूषेस बक्षिसेही जाहीर करण्यात आली.
दुसऱ्या दिवशी बॉलिवूड डे, रेट्रो डे इ. चे सादरीकरण झाले. यातही विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व सहभाग नोंदविला. सर्व पारंपारिक वेशभूषेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. प्रत्येक विभागाची एक थीम ठरविण्यात आली होती. प्रत्येक विद्यार्थ्यांनी रॅम्प वॉक करून भारतीय संस्कृतीचे पारंपारिक वेशभूषेचे सादरीकरण केले.
त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन तिसऱ्या दिवशी करण्यात आले होते. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये ग्रुप डान्स, सोलो डान्स, सोलो गायन इ. सादर करण्यात आले. एकूण कार्यक्रमांची संख्या ३५ होती. प्रत्येक विद्यार्थ्याने नृत्याविष्कार केला, त्यातून त्यांनी त्यासाठी घेतलेले कष्ट दिसत होते. उत्कृष्ट नृत्याविष्कारांना बक्षिसे जाहीर करण्यात आली. नृत्यामध्ये पण भरतनाट्यम, कथ्थक, पाश्चात्य इ. विविधता होती.
सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सादरीकरणाच्या वेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. एस. ए. पाटील,सचिव श्री. एस. एस. पाटील, कॅम्पस डायरेक्टर डॉ. एम. ए. चौगुले, प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. पोतदार, सर्व विभागप्रमुख, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. मान्यवरांनी सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ. प्रियंका पाटील, प्रा. मेघा बिराजदार, प्रा. अक्षया घाळीमठ, प्रा. मेघा देशमुख, प्रा. सुधन्वा देशपांडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
*फोटो ओळी: याप्रसंगी दीप प्रज्वलन करताना श्री. एस. ए. पाटील यांच्या समवेत कॅम्पस डायरेक्टर डॉ. एम. ए. चौगुले, प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. पोतदार, सर्व विभागप्रमुख*

























