सोलापूर : शहरातील पाथरूट चौक परिसरातील बेघर झालेल्या मागासवर्गीय कुटुंबांच्या पुनर्वसनाच्या मागणीसाठी युवा भीम सेनेच्या नेतृत्वाखाली
गुरुवारी सोलापूर महानगरपालिका इंद्रभुवन इमारत
परिसरात आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. पोलिस आणि सुरक्षा रक्षकांनी प्रसंगावधान राखत तत्काळ हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
पाथरूट चौक परिसरातील सुमारे १५ ते १६ कुटुंबांची घरे अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान पाडण्यात आली होती. या कारवाईनंतर संबंधित कुटुंबे बेघर झाली असून त्यांच्यासमोर निवारा आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुनर्वसनाशिवाय कारवाई केल्याचा आरोप करत ही कुटुंबे गेल्या काही दिवसांपासून न्यायासाठी संघर्ष करीत आहेत.युवा भीम सेनेच्या वतीने अनेक वेळा महापालिका प्रशासनाकडे निवेदने देऊन पर्यायी जागा व तात्पुरत्या निवाऱ्याची मागणी करण्यात आली होती. मात्र प्रशासनाकडून ठोस निर्णय न झाल्याने संतप्त कुटुंबीयांनी गुरुवारी महापालिका गाठली. आयुक्त कार्यालयासमोर घोषणाबाजी करत आंदोलन सुरू असतानाच काही आंदोलनकर्त्यांनी अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. परिसरात एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत संबंधित महिलेला आणि इतर आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. पोलिस आणि सुरक्षा रक्षकांनीही तत्परता दाखवत परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, महापालिका अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी संबंधित कुटुंबीयांचे म्हणणे ऐकून घेतले.
आंदोलनकर्त्यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत पुनर्वसनाशिवाय घरे पाडल्यामुळे महिला, लहान मुले आणि वृद्ध नागरिक उघड्यावर आल्याचे सांगितले. शासनाच्या पुनर्वसन धोरणाची अंमलबजावणी न करता कारवाई करण्यात आल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
दरम्यान, प्रशासनाकडून संबंधित कुटुंबांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन देण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र पुनर्वसनाचा ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा युवा भीम सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
Post Views: 8