सोलापूर : भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारे विविध उपक्रम उत्साहात राबविण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी, लसीकरण तसेच वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे, त्यांच्यामध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण व्हावी आणि स्वच्छता व आरोग्यदायी सवयींची रुजवणूक व्हावी, या उद्देशाने वैद्यकीय तपासणी शिबिर घेण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी करून आवश्यकतेनुसार औषधोपचार करण्यात आले. तसेच जवळपास शंभर विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.
शारीरिक आरोग्याबरोबरच वैयक्तिक स्वच्छता, स्वच्छतेच्या चांगल्या सवयी आणि आरोग्यदायी जीवनशैलीचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्याची योग्य काळजी घेऊन स्वच्छतेच्या चांगल्या सवयी अंगीकाराव्यात, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
दरम्यान, पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत प्रशालेच्या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. वृक्ष हे केवळ निसर्गाचे सौंदर्य नसून भावी पिढीच्या निरोगी जीवनाचे आधारस्तंभ आहेत, याची जाणीव विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये निर्माण करण्यात आली. आपल्या पाल्यांमध्ये पर्यावरणप्रेमाची भावना रुजविण्यासाठी पालकांनीही पुढाकार घ्यावा, असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.
प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या सीमा श्रीगोंदेकर-यलगुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. जोतिबा काटे व आरती बेंजरपे, प्रा.चंद्रकांत जाधव,प्रा.अर्चना अडसुळ,प्रा.श्रावण इंगळे,अर्चना यलगुलवार,प्रेमकांत सुपेकर,अस्लम मुलाणी, पांडुरंग राऊत,तहसीन जामभाई,मानसी निलंगीकर, कासिम मुजावर आदी शिक्षक वृंद यावेळी उपस्थित होता.
Post Views: 9