बार्शी – उमा महाविद्यालय पंढरपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अंतर्गत आंतर महाविद्यालयीन तायक्वांदो (मुली) स्पर्धेत येथील श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयांची बी.ए. भाग-३ ची खेळाडू गायत्री जयसिंग माने हिने ५७ किलो वजनी गटामध्ये उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला.
उल्लेखनीय यशाबद्दल तिची विवेकानंद युनिव्हर्सिटी जयपूर (राजस्थान) येथे आयोजित होणाऱ्या मानाच्या ‘ऑल इंडिया नॅशनल युनिव्हर्सिटी तायक्वांदो’ स्पर्धेसाठी विद्यापीठ संघात निवड झाली आहे.
दैदिप्यमान यशामुळे गायत्रीचा महाविद्यालयात सत्कार करण्यात आला व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यशाबद्दल संस्थेच्या संचालिका प्रार्थना ठोंबरे, खजिनदार वर्षाताई ठोंबरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोज गादेकर, उपप्राचार्य प्रा. भास्कर करडे, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. विशाल लिंगायत तसेच आय.क्यू.ए.सी. (IQAC) समन्वयक डॉ. गिरीष काशीद यांनी तिचे विशेष कौतुक केले.
गायत्री माने हिला महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रा. रोहित कांबळे आणि डॉ. रणजीत चांदणे यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. निवडीबद्दल महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी गायत्रीचे अभिनंदन केले असून जयपूर येथे होणान्या राष्ट्रीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.