सोलापूर – जिल्ह्यातील पंचायत समिती प्रशासन पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. करमाळा आणि मंगळवेढा या दोन तालुक्यांतील गटविकास अधिकाऱ्यांच्या कामकाजावरून निर्माण झालेल्या वादामुळे ग्रामविकास यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर आणि उत्तरदायित्वावर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. तालुक्याच्या विकास प्रक्रियेत गटविकास अधिकारी हे महत्त्वाचे प्रशासकीय केंद्र मानले जाते.
ग्रामपंचायती, पंचायत समिती, विविध विकास योजना आणि शासकीय निधीच्या अंमलबजावणीची प्रमुख जबाबदारी त्यांच्यावर असते. त्यामुळे या पदावरील अधिकाऱ्यांची उपस्थिती, निर्णयक्षमता आणि जनतेशी असलेला समन्वय विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मात्र अलीकडच्या काळात काही तालुक्यांमध्ये गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबत नाराजीचा सूर उमटत आहे. करमाळा पंचायत समितीतील काही प्रशासकीय निर्णयांवरून वाद निर्माण झाले असतानाच आता मंगळवेढा पंचायत समितीतील कामकाजावरूनही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांच्या वारंवार गैरहजेरी, प्रशासकीय समन्वयाचा अभाव आणि लोकप्रतिनिधींशी संवाद कमी असल्याच्या तक्रारी विविध स्तरावरून समोर येत आहेत.
स्थानिक स्तरावर व्यक्त होत असलेल्या मतांनुसार, पंचायत समिती कार्यालयात अधिकारी नियमित उपलब्ध नसल्यास विकासकामांच्या मंजुरी, प्रशासकीय प्रस्ताव, निधी वितरण आणि नागरिकांच्या दैनंदिन कामांवर परिणाम होतो. परिणामी सामान्य नागरिक, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि कर्मचारी यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. विशेष म्हणजे, ग्रामविकास विभागाच्या अनेक महत्त्वाच्या योजना सध्या ग्रामीण भागात राबवल्या जात आहेत. घरकुल, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, रोजगार हमी आणि विविध कल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पंचायत समितीचे नेतृत्व सक्षम असणे आवश्यक आहे.
अशा परिस्थितीत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित होणे ही प्रशासनासाठी चिंतेची बाब मानली जात आहे. यामुळे आता केवळ एखाद्या अधिकाऱ्याच्या कार्यशैलीचा प्रश्न राहिलेला नसून पंचायत समिती प्रशासनातील जबाबदारी आणि उत्तरदायित्वाचा व्यापक मुद्दा पुढे आला आहे. जिल्हा प्रशासनाने अशा तक्रारींची वस्तुनिष्ठ पडताळणी करून आवश्यक ते निर्णय घेणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.
चौकट
मंगळवेढ्याच्या गटविकास अधिकारी जास्मिन शेख यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्याची चर्चा आहे. मंगळवेढा पंचायत समिती कार्यालयाला नियुक्ती असताना कामावर येत आहे, असे कर्मचाऱ्यांना सांगून दिवसभर दांड्या मारल्याने लोकांची कामे खोळंबली. याबाबत आमदार समाधान आवताडे यांच्यापर्यंत तक्रारी गेल्यानंतर गटविकास अधिकारी शेख यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. शेख यांचीही आत्तापर्यंतची कार्यकीर्द वादळी ठरली आहे. उत्तर पंचायत समितीकडे नेमणुकीस असताना पदाधिकाऱ्यांबरोबर त्यांचे अनेक वेळा खटके उडाले. कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. डॉ.कदम आणि शेख यांच्या वादळी कारकिर्दीबाबत प्रशासनाला माहिती असतानाही त्यांच्यावर आत्तापर्यंत कारवाई झालेली नाही.
Post Views: 85