टेंभुर्णी – नॅशनल थर्मल पॉवर कार्पोरेशन (एनटीपीसी) या प्रकल्पाकडे हेल्पर म्हणून काम करणाऱ्या उजनी टें तालुका माढा येथील अपंग उत्तरेश्वर देविदास पाटील यांना कंपनीने अचानक कामावरून काढून टाकले असल्याने पाटील यांनी या अन्यायाविरोधात उजनी (टें) (भिमानगर) येथे गेटसमोर आमरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे.
शनिवारी उपोषणाचा सहावा दिवस असून त्यांची पृकृती खालावली आहे.त्यांना सोमवारपर्यंत दोन दिवसात कामावर घ्यावे अन्यथा आत्मदहन करू असा इशारा उपोषणकर्त्याची वृद्ध आई कालिंदा देवीदास पाटील यांनी बोलताना दिला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन फताडेवाडी सोलापूर येथे वीज निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे.या प्रकल्पासाठी उजनी (टें) (भिमानगर) येथून पाणीपुरवठ्यासाठी स्वतंत्र पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे.या ठिकाणी उजनी (टें) येथे पाच वर्षांपासून उत्तरेश्वर पाटील हे हेल्पर म्हणून काम करीत होते.गेल्या तीन महिन्यात पाटील यांना कंपनीने सोलापूर येथे बदली केली.नंतर कंपनीने त्यांना अचानक कामावरून काढून टाकले आहे.यामुळे पाटील कुटुंबावर मोठा अन्याय झाला आहे.पाटील यांचे आई-वडील ही वृद्ध असून वडील देखील अपंग आहेत. त्यांना दोन मुली व एक मुलगा आहे. मुले शिक्षण घेत आहेत.यामुळे सर्व कुटुंबाची जबाबदारी हीअपंग देविदास पाटील यांच्यावर आहे.
यामुळे उत्तरेश्वर पाटील यांनी १७ नोव्हेंबर रोजी एनटीपीसी प्रकल्पाचे प्रमुख विजय रेड्डी यांना कामावर घ्यावे अन्यथा आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन दिले होते.मात्र त्यांच्या त्याकडे प्रकल्प अधिकाऱ्यांना साफ दुर्लक्ष केले.सहा दिवस उपोषण करून उत्तरेश्वर पाटील यांची प्रकृती खालावली असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.पाटील हे धरणग्रस्त असून त्यांची शेती उजनी धरणासाठी ग्रहण करण्यात आली असल्याने ते भूमिहीन झाले आहेत.या घटनेकडे संपूर्ण उजनी (टें),भिमानगर व परिसरातील लोकांचे लक्ष वेधले असून सर्वजण त्यांना पाठींबा देत आहेत.
उपोषण स्थळी वृद्ध आई कालिंदा पाटील,सामाजिक कार्यकर्त्या स्वाती पाटील,पत्नी अनिता पाटील,सरपंच प्रतिनिधी सतीस पाटील,मुलगी कु.गौरी पाटील,माजी उपसरपंच मल्हारी गवळी,वंदना पाटील,ग्रा.प.सदस्य बाळासो पाटील,अमोल पाटील,आबा तनपुरे, प्रमोद मेटे आदीजन उपस्थित होते.

























