स्व. सौ. लक्ष्मीबाई (नीलाई) बाजीराव काळुंगे यांच्या स्मरणार्थ श्रीराम पॅलेस येथे धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे व प्रा. शोभाताई काळुंगे यांच्या संकल्पनेतून आयोजित पाच दिवसीय धनश्री प्रवचनमालेच्या दुसर्या दिवशी ’संत कान्होपात्रा अभंग चिंतन’ या विषयावर ते बोलत होते.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, संत कान्होपात्रांचा प्रत्येक अभंग हेच त्यांचे चरित्र आहे. पंधराव्या शतकातील प्रतिकूल सामाजिक परिस्थितीत मंगळवेढ्यातून पंढरपूरच्या विठ्ठलभक्तीचा निर्भय उच्चार करणे ही साधी गोष्ट नव्हती. तो त्यांच्या अंतःकरणातील भक्तीचा आणि अन्यायाविरुद्धच्या आध्यात्मिक विद्रोहाचा प्रत्यय आहे. कान्होपात्रा आपल्या अभंगातून नाम कसे घ्यावे, नामाचे परिणाम काय होतात आणि कोणाचे नाम घ्यावे, याचे अत्यंत सोपे व तात्त्विक मार्गदर्शन करतात. माणसाला नेहमी जवळचा आणि सोपा मार्ग आवडतो. भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी नामस्मरण ही सर्वांत जवळची, सोपी आणि श्रेष्ठ वाट आहे. आपण जगताना चांगल्या गोष्टींचा शोध घेत असतो; परंतु चांगले या शब्दाची व्याख्या करता येत नाही, तो अनुभव घ्यावा लागतो. त्याचप्रमाणे नामस्मरणाचा आनंद आणि त्याचे सामर्थ्यही अनुभवल्यानंतरच कळते. योग, याग, वेदाध्ययन किंवा शास्त्राभ्यासापेक्षा अंतःकरणातील निष्कपट भक्ती आणि प्रेमाने घेतलेले भगवंताचे नामच ईेशरापर्यंत पोहोचवते, असे त्यांनी स्पष्ट केले.
संत ज्ञानेेशर, संत नामदेव आणि संत तुकाराम यांच्या चरित्रातील भक्तीचा अखंड धागा संत कान्होपात्रांच्या जीवनातही दिसून येतो. त्यांच्या अभंगांमध्ये पांडुरंगावरील अढळ श्रद्धा, नामस्मरणाचे महत्त्व आणि गहन तात्त्विक विचार प्रतिबिंबित होतात. सामान्य अवस्थेतून उच्च आध्यात्मिक अनुभूतीपर्यंतचा जीवनप्रवास म्हणजे संतांचे चरित्र होय. त्यामुळे संतांच्या जीवनातील चमत्कारांपेक्षा त्यांच्या विचारांचे आणि आचरणाचे अनुकरण करणे अधिक महत्त्वाचे आहे. नामस्मरणामुळे पापी व दुराचारी व्यक्तीचाही उद्धार होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे, माजी मंत्री प्रा.डॉ. लक्ष्मणराव ढोबळे, प्रा. शोभाताई काळुंगे, नगराध्यक्षा सुनंदा आवताडे, डॉ. मीनाक्षी कदम, डॉ. आ. गो. पुजारी, रामचंद्र जगताप, आशा जगताप, प्रियदर्शनी कदम-महाडिक, राजेंद्र सुरवसे, ज्ञानदेव जावीर, युवराज गडदे, औदुंबर वाडदेकर, भारत बेदरे, अॅड. रमेश जोशी, सुभाष मर्दा, प्रा. विनायक कलुबर्मे, अजय अदाटे, वारी परिवाराचे सदस्य तसेच श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार कवी इंद्रजीत घुले यांनी केले.




















