पाच वर्षे, १० कंपन्या आणि हजारो गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये बुडाले. शेअर बाजाराचीही अशीच कथा आहे. येथे, करोडपती बनलेल्या लोकांपेक्षा कितीतरी पट जास्त लोक पैसे गमावतात. गेल्या पाच वर्षात भारतीय शेअर बाजाराने लक्षणीय तेजी नोंदवली आहे, मात्र या काळात अनेक चर्चित कंपन्यांच्या शेअर्समुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसानही झाले असून यामध्ये व्होडाफोन आयडिया आणि येस बँक सारख्या समभागांचा समावेश आहे जे रिटेल गुंतवणूकदारांमध्ये खूप लोकप्रिय आहेत.
या चर्चित शेअर्समुळे गुंतवणूकदार तोट्यात
बाजार गुंतवणूकदारांमध्ये चर्चित असलेल्या १० शेअर्सनी २०१८ ते २०२३ दरम्यान गुंतवणूकदारांचे ५६४,३०० कोटी रुपये बुडवले असून यामध्ये दिग्गज टेलिकॉम कंपनी वोडाफोन आयडिया आघाडीवर राहिली. प्रचंड कर्जात बुडालेल्या या कंपनीने गेल्या पाच वर्षांत गुंतवणूकदारांचे १.३९ लाख कोटी रुपये बुडवले, मोतीलाल ओसवालच्या वेल्थ क्रिएशन स्टडीमध्ये ही बाब समोर आली.
कोणत्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना रडवले
व्होडाफोन आयडियाच्या शेअर्सनी गेल्या पाच वर्षात ३४ टक्के CAGR दराने घसरले तर या यादीतील येस बँकेचे दुसरे मोठे नाव आहे ज्याने ४५ टक्क्यांनी वार्षिक गुंतवणूकदारांचे भांडवल बुडवले. याशिवाय IOCL, इंडियाबुल्स हाऊसिंग, इंडसइंड बँक, बंधन बँक, कोल इंडिया, न्यू इंडिया ॲश्युरन्स, जनरल इन्शुरन्स आणि इंडस टॉवर्सच्या शेअर्समुळेही गुंतवणूकदारांना गेल्या पाच वर्षात तोटा सहन करावा लागला आहे.
कोणत्या शेअर्समुळे गुंतवणूकदारांची चांदी
गेल्या पाच वर्षात बड्या कंपन्यांच्या शेअर्समुळे गुंतवणूकदारांचे मोठ्या प्रमाणात भांडवल बुडाले तर याच कालावधीत गेल्या पाच वर्षांत टॉप १० कंपन्यांपैकी सहा वित्तीय क्षेत्रातील कंपन्यांनी सर्वाधिक कमाई करून दिली आहे. यामध्ये गुंतवणूकदारच्या भरवशाचे रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस, ICICI बँक, इन्फोसिस आणि भारती एअरटेल यांचा समावेश आहे.
मोतीलालच्या अहवालानुसार २०१८ मध्ये टॉप १० कंपन्यांमध्ये १० लाख रुपयांची गुंतवणूक आज एक कोटी रुपयांची झाली असती. तर या कालावधीत ही संपत्ती ५९% सीएजीआरने वाढली असून सेन्सेक्सने १२% तेजी पकडली. तसेच संपत्ती निर्मितीच्या बाबतीत गेल्या वर्षभरात कॅप्री ग्लोबलने सर्वाधिक सातत्य दाखवले असून या काळात स्टॉकने ५०% पेक्षा जास्त CAGR ने गुंतवणूकदारांचे भांडवल वाढवले.