आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात शिवसेनेच्या (शिंदे गट) बैठकांना वेग आला आहे. टेंभी नाका येथील आनंदाश्रमात शिवसेनेचे ठाणे पालिकेतील माजी लोकप्रतिनिधी, विभागप्रमुख व महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये संघटनात्मक कार्यक्रम राबवणे तसेच निवडणुकांमध्ये प्रत्येक बुथवर आघाडी कशी घेता येईल, याबाबत खल करण्यात आला. त्यामुळे ठाणे शहरात निवडणुकांच्या अनुषंगाने शिंदे गट अधिकाधिक सक्रिय झाला आहे.
लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुकांआधी विविध पक्षांकडून पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत. शिवसेना शिंदे गटाने घेतलेल्या बैठकीत प्रत्येक मतदार यादीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी ‘शिवदूत’ (पक्षातील कार्यकर्ते) नेमणे, महिला बचत गटांचे मेळावे आयोजित करणे, नागरिकांशी जनसंपर्क वाढवणे या मुद्द्यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी माजी महापौर, ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के, ठाणे शहर प्रमुख अशोक वैती, महिला जिल्हाप्रमुख मीनाक्षी शिंदे उपस्थित होते. ठाणे लोकसभेच्या सहा विधानसभा मतदारसंघात अशा पद्धतीने बैठका सुरू आहेत, शिवसेनेच्या सर्व माजी लोकप्रतिनिधी, प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत या बैठका होत असल्याची माहिती ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी दिली