सोलापूर : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) संभाव्य पेपरफुटी आणि गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी गंभीर खेळ झाला असून या प्रकरणाची उच्चस्तरीय, निष्पक्ष आणि वेळबद्ध चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली आहे. आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सोलापूर महानगराच्या वतीने टीईटी परीक्षेतील पेपरफुटी व गैरव्यवहाराचा तीव्र निषेध करण्यात आला.
अभाविपने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लाखो विद्यार्थी अनेक महिन्यांपासून प्रामाणिकपणे परीक्षेची तयारी करत असताना ऐनवेळी परीक्षा पुढे ढकलणे हे अत्यंत दुर्दैवी असून विद्यार्थ्यांच्या मानसिक, शैक्षणिक आणि आर्थिक नुकसानीस कारणीभूत ठरले आहे. गेल्या काही वर्षांत राज्यातील विविध भरती व पात्रता परीक्षांमध्ये सातत्याने पेपरफुटीच्या घटना घडत असल्याने परीक्षा व्यवस्थेवरील विद्यार्थ्यांचा विश्वास कमी होत आहे.
परीक्षा प्रक्रियेत सुरक्षितता, गोपनीयता आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, डिजिटल ट्रॅकिंग, सक्षम सायबर सुरक्षा, स्वतंत्र देखरेख यंत्रणा आणि संबंधित अधिकाऱ्यांची स्पष्ट जबाबदारी निश्चित करावी, अशीही मागणी अभाविपने केली आहे.
यासोबतच संभाव्य पेपरफुटी प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी, दोषींवर कठोर फौजदारी कारवाई, विद्यार्थ्यांचे नुकसान लक्षात घेऊन लवकरात लवकर नव्या तारखेला परीक्षा घेणे तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्थेत संरचनात्मक व तांत्रिक सुधारणा तातडीने राबविण्याची मागणी करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही. शासनाने तातडीने ठोस पावले उचलली नाहीत, तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद राज्यभर तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही परिषदेने दिला आहे.



















