जालना : इंधन टंचाई, वाढते दर आणि पेट्रोल पंपांवरील लांबच लांब रांगांमुळे हैराण झालेल्या जनतेच्या प्रश्नांवर काँग्रेस पक्षाने आज मंगळवारी जालन्यात अनोख्या आणि तितक्याच आक्रमक शैलीत आंदोलन छेडले. बसस्थानका जवळील भारत पेट्रोल पंपासमोर काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी नागरिकांना झालमुडी आणि मेलडी चॉकलेट वाटप करत केंद्र सरकारच्या धोरणांचा जोरदार निषेध करत अनोखे आंदोलन केले. काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष कल्याण दळे आणि जालना महानगर शहर जिल्हाध्यक्ष डॉ. विशाल धानुरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शेतकरी रांगेत… सरकार परदेश दौऱ्यात!, डिझेल नाही, पण जाहिराती भारी!, जनतेला टंचाई… सत्तेला मलाई!वारे मोदी तेरा खेल सस्ती दारू महंगा तेल..अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
यावेळी बोलतांना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कल्याण दळे यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली. इंधन दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी डिझेलसाठी उन्हात रांगा लावत आहे, तर पंतप्रधान परदेश दौऱ्यांमध्ये व्यस्त आहेत. देशात एवढी भीषण इंधन टंचाई यापूर्वी कधीच झाली नव्हती, असा घणाघात त्यांनी केला.
शहर जिल्हाध्यक्ष डॉ.विशाल धानुरे यांनीही सरकारवर निशाणा साधतांना म्हटले की, जनता त्रस्त आहे, पण सरकार संवेदनाहीन झाले आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे कामगार, शेतकरी आणि मध्यमवर्गीयांचे जगणे कठीण झाले आहे. म्हणूनच आज आम्ही जनतेला झालमुडी आणि मेलडी चॉकलेट वाटत सरकारचा निषेध करत आहोत.
या आंदोलनात ज्येष्ठ नेते राजेंद्र राख,अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष बदर चाऊस, इकबाल कुरेशी, बासेद कुरेशी, संजय मुथा, राजेंद्र गोरे, संजय इंगळे, कृष्णा पडूळ, अजय बनकर, जफर मिर्झा, नारायण वाडेकर, कल्याणराव तारडे, बाबासाहेब सोनवणे, दिनेश सुराणा, वसीम शेख, रघुवीर गुडे, सुरज यलगंटवार, गौतम लांडगे, हाजी असिम मोमीन, युनूस हुसेन शेख, चंद्रकांत रत्नपारखी, योगेश कदम, दिग्विजय दांडगे, दिलीप चव्हाण,अमोल राठोड,शिवाजी लोखंडे, जय जाधव, जनार्दन चव्हाण यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. इंधन दरवाढ आणि टंचाई तातडीने दूर झाली नाही, तर काँग्रेस रस्त्यावर उतरून आणखी तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.