सोलापूर : आषाढी एकादशीनिमित्त सहस्त्रार्जुन प्राथमिक विद्यामंदिरात आयोजित करण्यात आलेल्या बालवारकऱ्यांच्या दिंडीने परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला. वारकरी संप्रदायाची परंपरा, भक्ती, संस्कार आणि सामाजिक जाणीव यांचा सुंदर संगम या उपक्रमातून अनुभवायला मिळाला. सुमारे ५०० विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे दिंडीला विशेष रंगत आली.
कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल मंदिर ट्रस्टचे सचिव जयकुमार कोल्हापुरे यांच्या हस्ते सपत्नीक पालखी पूजनाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषेत टाळ-मृदंगाच्या गजरात आणि विठ्ठलनामाच्या जयघोषात दिंडी काढली. दिंडीतील रिंगण सोहळा, विठ्ठल-रुक्मिणी तसेच अश्वाचे आकर्षक सादरीकरण उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते.
कार्यक्रमास विठ्ठल मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष संजीव बिद्री, शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष राजू भूमकर, सचिव गजानन गोयल, सदस्य संजीव रंगरेज, सुरेश बिद्री, शिरीष कोल्हापुरे, गणेश दामजी, भरतकुमार शालगर, तुकाराम पवार, गायत्री कोल्हापुरे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मंजुषा माने, प्रशालेचे मुख्याध्यापक मोरेश्वर काटवे, इंग्रजी विभागाच्या मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी बिराजदार, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत वारकरी परंपरेतील समता, सेवा, भक्ती आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख वंदना आळंगे, सुवर्णा भोपळे तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रमपूर्वक नियोजन केले. त्यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम शिस्तबद्ध, भक्तिमय आणि संस्मरणीय ठरला.
Post Views: 18