वैराग – धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपद अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. याच निवडीचे औचित्य साधून, महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या ‘एकता महिला मंच’ च्या वतीने व्यासपीठाचे प्रमुख प्रभाकर क्षीरसागर यांनी धाराशिव येथे त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी सौ. अर्चनाताई पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन यथोचित गौरव व सन्मान करण्यात आला.
महिलांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा
धाराशिव जिल्हा परिषद कार्यालयात संपन्न झालेल्या या भेटीत केवळ औपचारिकता न पाळता महिला सक्षमीकरणाच्या विविध पैलूंवर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रभाकर क्षीरसागर यांनी ‘एकता महिला मंच’च्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागात राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती अध्यक्षांना दिली. विशेषतः महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य, सामाजिक प्रतिष्ठा आणि ‘मी विधवा नव्हे, मी स्त्री’ यांसारख्या मोहिमेतून विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी मंच करत असलेल्या कार्याचा आढावा त्यांनी मांडला.
कार्याची दखल आणि कौतुक
एकता महिला मंचच्या कार्याची दखल घेत सौ. अर्चनाताई पाटील यांनी या उपक्रमांचे विशेष कौतुक केले. त्या म्हणाल्या की, “महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अशा व्यासपीठांची गरज आहे. आगामी काळात जिल्हा परिषदेच्या विविध योजनांच्या माध्यमातून महिलांच्या प्रश्नांना न्याय मिळवून दिला जाईल. तसेच मंचच्या आगामी मोहिमेत मी स्वतः उपस्थित राहून भगिनींना मार्गदर्शन करेन.”
बार्शी तालुक्यात मोठा प्रभाव, आता जिल्ह्याबाहेर विस्तार
एकता महिला मंच सध्या बार्शी तालुक्यातील ४९ गावांमध्ये अत्यंत प्रभावीपणे कार्यरत आहे. सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून महिलांचा आत्मविश्वास आणि मानसन्मान वाढवण्याचे मोठे काम या मंचने केले आहे. येणाऱ्या काळात सोलापूरसह धाराशिव जिल्ह्यातही आपल्या कार्याचा विस्तार करण्याचा मानस मंचने व्यक्त केला आहे.
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून महिलांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जातात. या योजनांचा लाभ शेवटच्या घटकातील महिलेपर्यंत पोहोचावा, या दृष्टीने ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या सदिच्छा भेटीचे जिल्ह्यातील महिला वर्गातून मोठ्या प्रमाणावर स्वागत होत आहे.























