सोलापूर : “सारखे विद्यापीठ, अभ्यासक्रम, प्राध्यापक आणि सुविधा उपलब्ध असूनही एखादा विद्यार्थी सर्वोच्च पॅकेज मिळवतो, तर दुसरा मागे राहतो. यश हे बाह्य परिस्थितीपेक्षा स्वतःच्या प्रयत्नांवर अवलंबून असते. त्यामुळे संधीची वाट पाहत बसू नका; स्वतःच्या संधी स्वतः निर्माण करा. यश तुमच्याच हातात आहे,” असे प्रतिपादन सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रामकृष्णन रामन यांनी केले.
हिराचंद नेमचंद वाणिज्य महाविद्यालय (स्वायत्त), सोलापूरच्या व्यवस्थापनशास्त्र विभागातर्फे एमबीए, बीबीए आणि बीसीए अभ्यासक्रमांच्या नवप्रवेशित विद्यार्थ्यांसाठी आयोजित दीक्षारंभ (इंडक्शन) कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
प्राचार्य डॉ. सत्यजीत शहा यांनी नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत करून गुणवत्तापूर्ण शिक्षण, अद्ययावत अभ्यासक्रम आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालय कटिबद्ध असल्याचे सांगितले. विभागप्रमुख डॉ. प्रीतम कोठारी यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ. रामन यांनी स्वयंसेवेसाठी पुढे येणे, जबाबदाऱ्या स्वीकारणे आणि नवनवी कौशल्ये आत्मसात करण्याचे आवाहन केले. “विश्वास आणि बांधिलकी हा व्यावसायिक यशाचा पाया आहे. चांगले काम करा, आपल्या कामाची वरिष्ठांना जाणीव करून द्या आणि जगालाही ते काम दिसू द्या,” असे त्यांनी सांगितले.
खेळ, कोडी आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून त्यांनी ‘चौकटीबाहेरचा विचार’ या संकल्पनेचे महत्त्व स्पष्ट केले. नावीन्यपूर्ण विचार, मूल्यवर्धन, ध्येयावर लक्ष केंद्रित करणे तसेच महत्त्व आणि निकड यांचा योग्य समन्वय साधून प्राधान्यक्रम निश्चित करण्याचा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
कार्यक्रमात महाविद्यालयातील विविध समित्यांच्या समन्वयकांनी विद्यार्थ्यांना समित्यांच्या कार्याची माहिती दिली. सूत्रसंचालन श्रीमती वनिता मारा यांनी केले, तर बीबीए विभागप्रमुख डॉ. रजनी क्षीरसागर यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्राध्यापक व नवप्रवेशित विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





















