सोलापूर : महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा सोलापूर व शेठ लोणकरणजी जगन्नाथजी चंडक ट्रस्ट, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा डॉ. लक्ष्मीनारायण बोल्ली स्मृती साहित्य पुरस्कार २०२६ यंदा समीक्षक-साहित्यिक डॉ. रणधीर शिंदे यांना जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती शाखेच्या अध्यक्षा डॉ. श्रुती वडगबाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. लक्ष्मीनारायण बोल्ली हे सोलापूरातील बहुआयामी साहित्यिक म्हणून ओळखले जात होते. त्यांनी मराठी भाषेत कथा, कविता, नाटक, कादंबरी, आत्मकथन तसेच अनुवाद अशा विविध साहित्यप्रकारांमध्ये मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दरवर्षी प्रदान केला जातो. यंदाचा पुरस्कार शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे मराठी विभाग प्रमुख तथा साहित्यिक डॉ. रणधीर शिंदे यांना देण्यात येणार आहे.
रोख रक्कम ११ हजार रुपये, सन्मानपत्र, मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा कार्यक्रम शनिवार दि. ९ मे २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता हिराचंद वाचनालय, सोलापूर येथे आयोजित करण्यात आला. हा पुरस्कार महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. श्रुती वडगबाळकर राहणार असून प्रमुख उपस्थिती म्हणून प्रमुख कार्यवाह डॉ. स्वाती महाळंक, मसाज पुण्याचे कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून शेठ लोणकरजी जगन्नाथजी चंडक ट्रस्टचे विश्वस्त किशोर चंडक, उपाध्यक्ष दत्ता सुरवसे, मसाप मुख्य कार्यवाह डॉ. नरेंद्र काटीकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यावर निवड झालेल्या तीन जणांचा सत्कार करण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यातून निवड झालेल्या पद्माकर कुलकर्णी, कल्याण शिंदे आणि डॉ. श्रुती वडगबाळकर यांचाही सन्मान होणार आहे. सर्व साहित्य रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेस कार्याध्यक्ष किशोर चंडक, फैय्याज शेख आदी उपस्थित होते.


























