वैराग – नागरिकांच्या रक्षणासाठी २४ तास सदैव तत्पर असणाऱ्या पोलीस प्रशासनाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि सामाजिक सलोखा जपण्यासाठी ‘एकता महिला मंच’च्या वतीने रक्षाबंधन सणानिमित्त एक अत्यंत भावूक आणि स्नेहपूर्ण उपक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला. सोलापूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये जाऊन पोलीस अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना राखी बांधण्याचा हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाचा शेवटचा टप्पा बार्शी उपविभागीय पोलीस अधिकारी (DySP) कार्यालय आणि बार्शी तालुका पोलीस ठाणे येथे उत्साहात संपन्न झाला.
सण-उत्सवाच्या काळात स्वतःच्या कुटुंबापासून व बहिणींपासून दूर राहून जनतेच्या रक्षणासाठी कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांना बहिणीची उणीव भासू नये, या उदात्त हेतूने एकता महिला मंचने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मंचाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी DySP कार्यालय व तालुका पोलीस ठाण्यात उपस्थित राहून पोलीस उपविभागीय अधिकारी सुहास जगताप,सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे तसेच एकता महिला मंचचे प्रमुख प्रभाकर क्षीरसागर यांच्यासह सर्व पोलीस अधिकारी,सर्व कर्मचारी आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले.
गेल्या ५ वर्षांपासून उपक्रमाची परंपरा: प्रभाकर क्षीरसागर
याप्रसंगी बोलताना एकता महिला मंचचे प्रमुख प्रभाकर क्षीरसागर म्हणाले, “खाकी वर्दीतही एक आपुलकीचा भाऊ असतो, ही जाणीव समाजात निर्माण व्हावी आणि पोलीस व नागरिकांमध्ये सामंजस्य राहावे या उद्देशाने आम्ही गेल्या ५ वर्षांपासून हा उपक्रम राबवत आहोत. सोलापूर जिल्ह्यातील सर्व पोलीस बांधवांना राखी बांधून त्यांच्या आनंदात सहभागी होणे हे आमचे भाग्य आहे. आगामी काळातही महिलांच्या हक्कासाठी, त्यांच्या पाठबळासाठी आणि समाजप्रबोधनासाठी एकता महिला मंचच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवले जातील.”
तसेच जिल्हाप्रमुख लक्ष्मी सुतार यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “रक्षाबंधनाला अनेक बहिणींना भाऊ नसतात किंवा अनेक पोलीस बांधवांना बहिणींकडे जाणे शक्य होत नाही. अशा वेळी एकता महिला मंचच्या माध्यमातून दोघांनाही एक हक्काचे नाते मिळाले आहे. या उपक्रमाला सोलापूर जिल्ह्यातून मिळालेला प्रचंड प्रतिसाद आणि आपुलकी यामुळे आम्ही अत्यंत भावूक झालो आहोत.”
प्रमुख अधिकाऱ्यांच्या विशेष प्रतिक्रिया
सुहास जगताप (पोलीस उपविभागीय अधिकारी – DySP, बार्शी)
”एकता महिला मंचच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यातील पोलीस बांधवांना राखी बांधून आनंदाचा क्षण देणे, हा अत्यंत स्तुत्य आणि कौतुकास्पद उपक्रम आहे. महिला भगिनींनी कार्यालयात येऊन मला व माझ्या सहकाऱ्यांना राखी बांधल्याने आमचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. या उपक्रमाने आम्हा सर्वांना कृतज्ञतेच्या धाग्यात बांधले आहे. एक भाऊ म्हणून आम्ही सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. त्यांच्या समस्या व प्रश्ना सोडवण्यासाठी सदैव कटिबद्ध आहोत.”
अक्षय सोनवणे (सहाय्यक पोलीस निरीक्षक – API, बार्शी तालुका पोलीस ठाणे)
”पोलीस सदैव जनतेच्या संरक्षणासाठी कार्यरत असतात. सणासुदीच्या काळात स्वतःच्या बहिणीकडे जाणे शक्य नसताना एकता महिला मंचच्या भगिनींनी पोलीस ठाण्यात येऊन राखी बांधली, हा क्षण आमच्यासाठी अत्यंत भावूक आणि आनंदाचा आहे. पोलीस आणि जनतेमधील हा आपुलकीचा व स्नेहाचा धागा असाच कायम राहो. महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी आम्ही १०० टक्के लक्ष देऊन काम करू. या सामाजिक कार्यासाठी एकता महिला मंचला माझ्या मनापासून खूप खूप शुभेच्छा!”
सर्वत्र होतंय कौतुकाचा वर्षाव
बार्शी DySP कार्यालय आणि तालुका पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी, पुरुष कर्मचारी व महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी या उपक्रमात उत्साहाने भाग घेतला. पोलीस ठाण्याच्या वातावरणात एक कौटुंबिक आणि आपुलकीचा स्नेह निर्माण झाला होता. सोलापूर, धाराशिव जिल्ह्यांसह संपूर्ण महाराष्ट्रातून एकता महिला मंचच्या या आगळ्यावेगळ्या आणि सामाजिक सलोखा जपणाऱ्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले जात आहे.
उपस्थित पदाधिकारी व सदस्य:
या प्रसंगी एकता महिला मंचच्या जिल्हाप्रमुख लक्ष्मी सुतार, स्नेहल तळेकर, जयश्री बादगुडे, उषा ठाकूर, सुरेखा कोळी, रेणुका चौगुले यांच्यासह इतर अनेक पदाधिकारी व महिला सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Post Views: 10