बार्शी – सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा तब्बल २ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी करून गेल्याप्रकरणी गेल्या १५ महिन्यांपासून फरार असलेल्या महिला आरोपीस बार्शी तालुका पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बहुसिंगपुरा येथील डोंगराळ भागातून शिताफीने अटक केली. राणी अरुण साळवे (भिवसने), वय २६, रा. बहुसिंगपुरा, जि. छत्रपती संभाजीनगर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १७७/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी पोलिसांना गुंगारा देत वारंवार मोबाईल क्रमांक व राहण्याची ठिकाणे बदलत होती. नृत्यकलेचे कार्यक्रम करून ती विविध भागांत फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आरोपीच्या शोधासाठी विशेष पथक तयार करण्यात आले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी बहुसिंगपुरा येथील डोंगराळ परिसरात असल्याची माहिती मिळाली. मात्र, डोंगराळ भागामुळे मोबाईल लोकेशनच्या आधारे आरोपीचा अचूक ठावठिकाणा शोधणे आव्हानात्मक ठरत होते.
पोलीसांचा शेतकरी व कामगार वेशभूषा
अखेर पोलिसांनी शेतकरी व कामगाराचा वेश धारण करुन दीड दिवस परिसरात वावरत आरोपीच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले. योग्य संधी साधून पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले. चोरीस गेलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरु असून आरोपीस न्यायालयात पोलीस कोठडी रिमांडसाठी हजर करण्यात आले आहे.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, महिला पोलीस उपनिरीक्षक सिंधुताई देशमुख, अमृत खेडकर, प्रदीप चौधरी, युवराज गायकवाड, ओमप्रकाश दासरे व सिद्धेश्वर लोंढे यांच्या पथकाने केली.