सोलापूर : अज्ञात कारणावरून एका ७४ वर्षीय वृद्धाचा गळा दाबून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील होटगी रोडवरील ‘निर्मिती विहार’ परिसरात
उघडकीस आला आहे. दरम्यान याप्रकरणी अज्ञात मारेकऱ्यावर विजापूर नाका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विरेश संगय्या वस्त्रद (वय ७४ वर्ष, रा. निर्मिती विहार, विजापूर रोड ,सोलापूर) असे मृत वृद्धाचे नाव असून याबाबत मयताची मुलगी अन्नपूर्णा वीरेश वस्त्रद उर्फ प्रगती सोमनाथ कडगंची (वय ४५, रा. स्वामी विवेकानंद नगर, होटगी रोड ,सोलापूर) यांनी फिर्याद दिली.
मृत विरेश हे पंचांग पाहत होते. त्यांच्या ओळखीतील व्यक्ती त्यांना संपर्क साधून त्यांच्याकडे पंचांग पाहण्यासाठी येत होते. शनिवार, ६ जून रोजी सकाळी दुधवाला हा दूध ठेवून गेला. पण बराचवेळ होऊनही ते दूध बाहेरच होते. यामुळे शेजाऱ्यांनी पाहिले असता, त्यावेळी ही घटना उघडकीस आली.
विरेश वस्त्रद हे त्यांच्या घरातील बेडरूममध्ये जमिनीवर उताण्या स्थितीत बेशुद्धावस्थेत आढळून आले. त्यांच्या गळ्यावर संशयास्पद लाल-काळ्या रंगाचे व्रण दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच विजापूर नाका पोलिसांनी तत्काळ धाव घेऊन वस्त्रद यांना उपचारासाठी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
सुरुवातीला या मृत्यूबाबत गूढ निर्माण झाले होते. परंतु शवविच्छेदन झाल्यानंतर डॉक्टरांनी दिलेल्या प्राथमिक अहवालात विरेश वस्त्रद यांचा मृत्यू गळा दाबल्यामुळे झाल्याचे स्पष्ट केले. अज्ञाताने कोणत्या तरी अज्ञात कारणावरून वस्त्रद यांचा गळा दाबून खून केल्याची खात्री पटल्यानंतर, या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक सुशांत वराळे हे गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.
Post Views: 27