सोलापूर : डी-मार्ट परिसरासमोरील दोन फळविक्रीच्या दुकानांना आग लागल्याची घटना आज घडली. या आगीत दोन्ही दुकानांचे नुकसान झाले, तर शेजारील कॅन्टीन आणि परिसरातील मोठ्या वृक्षांनाही आगीची झळ पोहोचली. घटनेची माहिती मिळताच उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाचे अधीक्षक राकेश साळुंखे यांनी जवानांसह घटनास्थळी पोहोचून सुमारे अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली.
उपमहापौर देवकर या प्रभागातील विविध समस्यांची पाहणी करीत असताना काही नागरिकांनी त्यांना आगीच्या घटनेची माहिती दिली. त्यांनी तत्काळ अग्निशमन अधीक्षक राकेश साळुंखे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून अग्निशमन दलाला पाचारण केले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचे काम सुरू केले. डी-मार्टसमोरील सुधाकर कोरे यांच्या फळविक्रीच्या दुकानात प्रारंभी आग लागली. त्यानंतर ही आग पसरून पुढील ग्रीन शेडपर्यंत पोहोचली. शेजारील जइद बागवान यांच्या फळविक्रीच्या दुकानालाही आग लागली. तसेच बाजूला असलेल्या कॅन्टीनलाही आगी झळ पोहोचली.पत्राशेडच्या मागे साचलेल्या कचऱ्याला आग लागल्यामुळे ती पसरली असावी, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आग अधिक पसरून नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ नये, यासाठी अग्निशमन दलाने आवश्यक उपाययोजना केल्या. अग्निशमन दलाच्या एका गाडीच्या मदतीने पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यात आली. दुकानांमधील गॅस आणि इतर वस्तू सुरक्षितपणे बाहेर काढण्याच्या दृष्टीनेही तत्काळ कार्यवाही करण्यात आली. परिसरातील मोठ्या वृक्षांना लागलेली आगही विझविण्यात आल्याने वृक्षांचे संरक्षण करण्यात यश आले.
उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर आणि अग्निशमन अधीक्षक राकेश साळुंखे यांनी आग पूर्णपणे आटोक्यात येईपर्यंत घटनास्थळी थांबून परिस्थितीवर लक्ष ठेवले.
Post Views: 9