जालना – शहरातील बालाजी चौक येथे चर्मकार समाजाच्या वतीने “बालाजी महाराज चौक” या चौकास जगद्गुरु श्री संत रोहिदास महाराज यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी १५ एप्रिल २०२६ पासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले होते.
मात्र, संबंधित चौकाचे “बालाजी महाराज चौक” असे नामकरण पूर्वीच मंजूर झाल्याने त्याच चौकास दुसरे नाव देणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाले. यानंतर जालना शहरातील अन्य योग्य ठिकाणी संत रोहिदास महाराज यांच्या नावाने चौक नामकरण व स्मारक उभारणीचा ठराव घेण्याची मागणी करण्यात आली.
दरम्यान, उपोषणस्थळी भेट देत भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी उपोषणकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली. येत्या मे महिन्यातील सर्वसाधारण सभेत योग्य ठिकाण निश्चित करून पुढील १५ दिवसांत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
या आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांनी समाधान व्यक्त करत उपोषण मागे घेतले. यावेळी समितीचे अशोक भगुरे, योगेश बिल्लोरे, दिनेश लामकाने, सचिन इरछे, विकास बिल्लोरे, संतोष कुरील, विनोद आक्से यांनी पाणी प्राशन करून उपोषण सोडले.
या प्रसंगी भाजपा गटनेते महेश निकम, नगरसेवक सिद्धिविनायक मुळे, जीवन सले, अजित मानधानी, कल्याण भदनेकर, महुने तसेच शहर अभियंता सौद आदी उपस्थित होते.



























