सोलापूर : 23 एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो,या दिनाचे औचित्य साधून चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमध्ये सामूहिक वाचनाचा प्रेरणादायी उपक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, ज्ञानाची गोडी वाढावी आणि वाचन संस्कृती रुजावी या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
या उपक्रमामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी एकाच वेळी विविध प्रकारची पुस्तके वाचून वाचनाचा आनंद लुटला. कथा, कादंबरी, विज्ञान, चरित्र, तसेच प्रेरणादायी साहित्य अशा विविध विषयांवरील पुस्तकांचे वाचन करण्यात आले. संपूर्ण परिसरात एकाच वेळी वाचनाचे वातावरण निर्माण झाल्याने ज्ञानाचा एक वेगळाच उत्सव साजरा होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
प्राचार्या सीमा श्रीगोंदेकर-यलगुलवार यांच्या कल्पक मार्गदर्शनामुळे हा उपक्रम यशस्वी झाला.“पुस्तक हेच खरे मित्र असून,वाचन ही सवय आयुष्यभर उपयोगी पडते,” या उक्ती प्रमाणे सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत उपक्रमात मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.जागतिक पुस्तक दिनानिमित्त आयोजित सामूहिक वाचनाचा हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची प्रेरणा निर्माण करणारा ठरला.


























