मंगळवेढा – आगामी गणपती उत्सवाच्या अनुषंगाने मंगळवेढा व सांगोला पोलीस ठाणे हद्दीतील गणपती मंडळाचे पदाधिकारी, पोलीस पाटील, शांतता कमिटीचे पदाधिकारी तसेच विविध राजकीय पक्ष व संघटनांचे पदाधिकारी यांची विभागीय स्तरावरील शांतता मीटिंग आज (मंगळवार, ८ सप्टेंबर २०२६) दुपारी ३:३० ते ४:३० या वेळेत राजपूत मंगल कार्यालय, मंगळवेढा-पंढरपूर रोड येथे संपन्न झाली.
या बैठकीला अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती प्रेरणा कट्टे मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी मंगळवेढा शिवपूजे , सांगोला पोलीस ठाणे कडील पोलीस निरीक्षक देशपांडे , महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे पाटील साहेब, नगरपालिकेचे रसाळ मॅडम, कांबळे
तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गायकवाड यांच्यासह मंगळवेढा व सांगोला पोलीस ठाणे कडील अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी माननीय वरिष्ठ कार्यालयाकडून आलेल्या सूचनाप्रमाणे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कट्टे मॅडम व उपविभागीय पोलीस अधिकारी मंगळवेढा शिवपूजे यांनी गणपती मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
डीजे, डॉल्बी स्पीकर वापरताना ध्वनी मर्यादीपेक्षा अधिक आवाज करू नये
वादग्रस्त गाणी वाजवू नयेत
वेळ बाह्य व नियमबाह्य वाद्य वाजवू नयेत
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ध्वनिप्रदूषण टाळावे
मूर्ती विक्रेते यांनी पर्यावरण पूरक मूर्ती निर्माण कराव्यात
मूर्ती धोकादायक व असुरक्षित पद्धतीने ठेवू नयेत
मूर्ती रस्त्यावर ठेवू नयेत
कोणाच्याही धार्मिक भावना दुखावणार नाहीत अशा वस्तू ठेवू नयेत
मंडपवाले यांनी सुरक्षिततेचे सर्व नियम पाळावेत
विद्युत वितरण कंपनीने वीज जोडणीच्या सुरक्षिततेकडे लक्ष द्यावे
नगरपालिकेने स्वच्छता व पाणीपुरवठ्याची योग्य व्यवस्था करावी
सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांची दुरुस्ती तातडीने करावी
उपस्थित मान्यवरांचे मार्गदर्शन
मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती प्रेरणा कट्टे मॅडम यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात गणेशोत्सव शांततेत व शिस्तीत पार पाडण्याचे आवाहन केले. “कोणत्याही प्रकारचा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे,” असे त्यांनी सांगितले.
मा. उपविभागीय पोलीस अधिकारी शिवपूजे यांनी गणपती मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना स्थानिक पातळीवरील संवेदनशील मुद्द्यांवर चर्चा केली. “धार्मिक सण हे समाजातील एकतेचे प्रतीक असतात. त्यामुळे सर्वांनी एकमेकांचा आदर करून उत्सव साजरा करावा,” असे त्यांनी सांगितले.
सांगोला पोलीस ठाणे कडील पोलीस निरीक्षक देशपांडे साहेब यांनी मिरवणुकीच्या मार्गाचे नियोजन व वाहतूक व्यवस्थेबाबत सविस्तर माहिती दिली.
शांतता कमिटीचे पदाधिकारी तसेच विविध राजकीय पक्ष व संघटनांचे पदाधिकारी यांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आश्वासन दिले. “आमचा उत्सव शांततेत व आनंदाने साजरा होईल, यासाठी आम्ही पूर्ण सहकार्य करू,” असे गणपती मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्यात यंदा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजे-डॉल्बीवर अनेक जिल्ह्यांमध्ये निर्बंध घालण्यात आले आहेत. सोलापूर जिल्ह्यातही १३ ते २६ सप्टेंबर या कालावधीत डीजेवर बंदी घालण्यात आली आहे.
यंदाचा गणेशोत्सव १४ सप्टेंबरला सुरू होऊन २५ सप्टेंबरला अनंत चतुर्दशीच्या दिवशी संपणार आहे.