माढा – आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांचे अचूक रोगनिदान होऊन त्यांच्यावर योग्य उपचार होतात. आरोग्याची ही सेवा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे मोलाचे काम आमदार अभिजीत पाटील यांच्या माध्यमातून सातत्याने होत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी केले.
माढा येथील ग्रामीण रुग्णालयात आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य ‘महाआरोग्य शिबिराचे’ आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सदानंद वनकळस यांनी केले.
पुढे बोलताना बाळासाहेब पाटील म्हणाले की, आमदार पाटील यांच्या प्रयत्नांतून माढा येथे डायलेसिस युनिट मंजूर झाले असून ते लवकरच सुरू होणार आहे. आतापर्यंत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून मतदारसंघात ३ कोटी रुपयांपेक्षा जास्त मदत रुग्णांना मिळवून देण्यात आली आहे. कोणत्याही रुग्णाला मोठ्या उपचारासाठी मोठ्या शहरात जाण्याची गरज भासल्यास आपली यंत्रणा २४ तास कार्यरत आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.
या शिबिरादरम्यान तब्बल ९७० रुग्णांची मोफत तपासणी व उपचार करण्यात आले. यामध्ये ६ रुग्णांवर वाचादोष शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आली. तसेच ५७ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली असून त्यांच्यावर लवकरच शस्त्रक्रिया केली जाईल. शिबिरात ३२० गरजूंना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. या महाकार्यासाठी १५० हून अधिक आरोग्य कर्मचारी, परिचारिका आणि आशा वर्कर्सनी परिश्रम घेतले.
या प्रसंगी विलासबप्पा देशमुख, ॲड. बाळासाहेब पाटील, आनंदराव कानडे, रावसाहेब देशमुख, ज्योतीताई कुलकर्णी, बालाजी पाटील, दीपक देशमुख, डॉ. संतोष दळवी, कुरण गिड्डे, शिवाजी सुर्वे, दिनेश जगदाळे, बाबासाहेब पारडे, राजाभाऊ भांगिरे, संतोष मुटकुळे, ओंकार गवसने, कल्याण गाडे, उत्तम पालकर, सागर कांबळे, राजाभाऊ यादव, शंभू साठे, आबा साठे, राहुल जाधव, अच्युत उमाटे, भारत खंडागळे, वैभव पाटील, जावेद पठाण, रवी सरवदे, जितेंद्र जमदाडे, भैय्या खरात, यु. एफ. जानराव, अभिजीत उबाळे, अक्षय शिंदे, तुषार बारबोले यांच्यासह परिसरातील नागरिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.