बार्शी – तालुक्याच्या दुष्काळी भागाला दिलासा देणाऱ्या बार्शी उपसा सिंचन योजना टप्पा-१ या महत्वाकांक्षी प्रकल्पाला मोठे यश मिळाले आहे. उजनी धरणातून कोरफळे शिवारातील पंप हाऊस येथे पाणी यशस्वीरित्या सोडण्यात आले. या योजनेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या मान्यता आणि निधीमुळे तसेच आमदार राजेंद्र राऊत यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा, बैठका आणि जलसंपदा विभागाशी केलेल्या समन्वयामुळे हा टप्पा पूर्णत्वास आला आहे.
कोरफळे ग्रामस्थ यांच्यावतीने पाणीदार आमदार राऊत
यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कोरफळे शिवार, पंप हाऊस परिसर येथे भव्य पाणीपूजन समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभाचे आयोजन समस्त कोरफळे ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले होते. पाणीदार आमदार म्हणून ओळखले जाणारे राजेंद्र राऊत यांच्या हस्ते पाणीपूजन करण्यात आले. या पाण्यामुळे कोरफळे गावातील तब्बल २५०० एकर शेतजमीन ओलीताखाली येणार आहे. गेली अनेक वर्षे पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या या भागातील शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामात शेती करता येणार असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.
पाणी पूजनानंतर बोलताना राऊत म्हणाले, आज कोरफळे गावासाठी आणि संपूर्ण बार्शी तालुक्यासाठी ऐतिहासिक दिवस आहे. उजनीचे पाणी पंप हाऊसपर्यंत पोहोचले.
यामुळे २५०० एकर शेतीला संजीवनी मिळाली आहे. हे सर्व श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीला जाते. त्यांच्या ठाम निर्णयामुळे हा प्रकल्प मार्गी लागला. हा फक्त पाण्याचा प्रवाह नाही, तर शेतकऱ्यांच्या आशेचा प्रवाह आहे. बार्शी तालुक्याला पाणीदार करण्याचा आपला संकल्प आहे. पुढील टप्प्यातही अशीच कामे मार्गी लावू. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हेच आमचे खरे बक्षीस आहे.