पंढरपूर – सुमारे ५८ लाखा पेक्षा जास्त कुणबी नोदींची प्रमाणपत्रे मराठा समाजाने घेतल्यास सुमारे अडीच कोटी पेक्षा जास्त मराठा समाज आरक्षणाचा लाभ उठवु शकणार आहे. त्यामुळे ५८ लाख नोदीं घेतल्या शिवाय आता २९ आँगस्टला माघार घ्यावयाची नाही असा सज्जड इशारा मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे आज मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचे आयोजन करण्यात आलेले होते. या विराट सभेस संबोधित करताना जरांगे पाटील बोलत होते.
यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले, ५८ लाख नोंदी म्हणजे मराठ्यांचे पक्के आरक्षण आहे. त्यामुळे शासनाकडून आता शेवटचे मोठे शडयंत्र मराठा समाजा बरोबर खेळले जात आहे. त्यामुळे मराठा समाजाला आता सरकारचा बाप व्हावे लागणार आहे. कारण जी प्रमाणपत्रे मिळालेली आहेत ती जातपडताळणी कार्यालायकडून रद्द करण्याची मोहिम सध्या शासनाकडून सुरु करण्यात आलेली आहे. महसूल मंत्री बावन्नकुळे धडधडतीत पत्र देवून कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्याचा आदेश देत आहेत.
सातारा, कोल्हापूर, पुणे आणि ओंध या दोनशे, अडीचशे वर्षापूर्वीच्या नोंदी आहेत. त्याचे सगळे जीआर काढून ते लागू करुन घ्यावयाचे आहे. हैद्राबाद गँझेटीयरनुसार सगळ्या नोंदी मराठवाड्याला घ्यावयाचे आहेत त्या शिवाय शासनाला सुट्टी द्यावयाची नाही. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या पोरांवर जेवढ्या केसेस दाखल करण्यात आलेल्या आहेत त्या मागे घेण्याचे शासनाने दिलेला शब्द आहे तो देखील आता पुर्ण करुन घ्यावयाचा आहे.
शासनाने मराठा समाजातील तरुणांना उद्योजकांचे स्वप्न दाखवून एक नवी खेळी केलेली आहे. कारण या तरुणांना उद्योजक बनविण्यासाठी आण्णासाहेब पाटील विकास महामंडळाकडून कर्ज दिले गेले आहे. हा जाणीवपुर्वक शासनाकडून कट रचन घाट घातला गेलेला आहे. त्यामुळे आज परिस्थिती अशी आलेली आहे की अनेक मराठा समाजातील तरुण उद्योजक आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत. आर्थिक अडचणींमुळे कर्जाचे हप्ते हे उद्योजक मंडळी भरु शकलेले नाहीत. त्यामुळे अनेकांचे सी-बील खराब झालेले आहेत. त्यामुळे सर्व मराठा समाजातील तरुण उद्योजकांच्या नरड्याला फास लागलेले आहेत. सगळ्या मराठा समाजातील पोरांचे व्याजपरतावे घेतल्या शिवाय शासनाला सोडायचे नाही असा देखील इशारा यावेळी जरांगे पाटील यांनी दिला.
शासन बोलतंय एक आणि करतंय एक. कारण आपण ओबीसी समाजाला मिळणाऱ्या सर्व सोयीसुविधा मराठा समाजाला लागू करण्यासाठीची आपली आग्रही मागणी आपण शासनाकडून मान्य करुन घेतलेली आहे. मात्र त्या संदर्भातील जीआर अजून देखील काढले जात नाहीत. जे जीआर काढले आहेत त्याची शासनाकडून व्यवस्थित अंमलबजावणी केली जात नाही. सारथी स्थापन केली गेली मात्र त्यामधील १ हजार ५५४ अभ्यासक्रमच मराठ्यांना लागू केले गेले नाहीत. या शासनाने मराठा समाजाची अक्षरश: फरफट चालू केलेली आहे. या शासनाच्या डोक्यात गेलेली हवा आता आपणाला काढावयाची आहे. कारण यांना वाटते आपण बहूमतात आहोत आमचे कुणीही काहीही करु शकत नाही. त्यामुळे यांना आता मराठा समाजा काय आहे हे दाखवून द्यावयाचे आहे.
आज पर्यत एक म्हण म्हटली जात होती की सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. त्यामुळे २९ आँगस्टला या शासनकर्त्य्रांना दाखवून द्यावयाचे आहे की मराठ्यांपुढे सत्तेचे शहाणपण चालत नाही. नुसते मराठे मुंबईत घुसले तर अर्धे मंत्री मुंबई बाहेर गेले होते. त्यामुळे आता आमचा नाद करु नका,आमच्या मागण्या मान्य करा असे देखील आवाहन त्यांनी शासनकर्त्यांना केले. .
————————–
चौकट : ( तुझे बावन्न कुळ तर आमचे शहाणऊ कुळ आहे )
या सभेत जरांगेपाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंवर विखारी भाषेत टीकेचे बाण सोडले. बाव्वनकुळे तु आमचा नाद करु नकोस, तु बावन्नकुठे आहेस पण आम्ही शहाण्णवकुळी मराठा आहोत. तु आत्ताच सुधार नाहीतर मराठ्यांची पोरटी तुला रस्त्यावरुन देखील फिरु देणार नाहीत असा देखील इशारा यावेळील मनोज जरांगे पाटलांनी मंत्री बावनकुळे यांना दिला.
————————
चौकट : ( विठ्ठल रखुमाईचे दर्शन )
मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी पंढरपूर दौऱ्यात येथील विठ्ठल रखुमाईचे मंदिरात जावुन दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या समवेत पंढरपूरच्या नगराध्यक्षा तथा मंदिर समितीच्या पदसिध्द सदस्या डाँ.प्रणिता भालके तसेच मराठा समाजातील नेते मंडळी देखील उपस्थित होते.
Post Views: 7