नाशिक : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या हस्तक्षेपामुळे देशभरातील शंभर जागा विरोधकांच्या हुकल्या असा गंभीर आरोप शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी काल नाशिक मध्ये केला.
केंद्रामध्ये सत्तापलट झाल्यास निवडणूक आयोगातील तीन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी माध्यमांशी बोलताना दिला. विधान परिषदेच्या नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाचे उमेदवार ऍड. संदीप गुळवे यांच्या प्रचारासाठी खासदार राऊत हे नाशिक मध्ये आले होते त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी हा इशारा दिला.
देशभरातील शंभर जागा केवळ 500 ते 1000 मतांमुळे विरोधकांना गमवाव्या लागल्या त्यामागे निवडणूक आयोगाचा दबाव होता. धुळे लोकसभा मतदारसंघातही अशाच प्रकारे मतमोजणी पूर्ण होण्याआधीच निकाल घोषित करण्यासाठी दबाव आला होता असा आरोप त्यांनी केला.
केंद्रामध्ये सत्तापालट झाल्यास निवडणूक आयोगाच्या या अधिकाऱ्यांवर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही असे त्यांनी सांगितले. दरम्यान काही ठिकाणी विशेषता सांगलीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मदत न केल्यामुळेच उद्धव ठाकरे गटाचा उमेदवार पराभूत झाला असाही आरोप त्यांनी केला. भाजपाने उद्धव ठाकरे गटाला टार्गेट केल्यामुळे काही जागा गमवाव्या लागल्या असे सांगून त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या विधानावरही टीका केली.
शरद पवार यांच्या पक्षाचा विजयी जागांचा सरासरी दर जास्त असला तरी सर्वाधिक जागा आम्ही लढलो होतो असे ते म्हणाले. दरम्यान, शिक्षक मतदार संघाचे पावित्र्य नष्ट होऊ नये यासाठी पैशांचे वाटप करून हा मतदार संघ वाईट करू नका असेही राऊत म्हणाले. राऊत यांच्या उपस्थितीत नाशिक मधील शिक्षकांचा मेळावाही घेण्यात आला.