सोलापूर : “प्रसिद्धीसाठी नव्हे, तर समाजपरिवर्तनासाठी मी लिहित गेले. मात्र समीक्षा कधीच माझ्या वाट्याला आली नाही. पुरुष समीक्षकांना महिला लेखिकेबद्दल काहीसा संकोच असतो. खऱ्या अर्थाने लेखकाला न्याय देणारी गोष्ट म्हणजे समीक्षा नव्हे, तर जीवनच असते,” असे स्पष्ट मत मराठी साहित्यातील ठाम आणि स्वतंत्र आवाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेघना पेठे यांनी व्यक्त केले.
प्रिसिजन वाचन अभियानांतर्गत आयोजित विशेष मुलाखतीत त्या बोलत होत्या. ही मुलाखत प्रख्यात मुलाखतकार सुश्रुत कुलकर्णी यांनी घेतली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रिसिजन फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला.
या संवादात पेठे यांनी आपल्या लेखनप्रवासातील विविध पैलूंवर मनमोकळेपणाने भाष्य केले. फिक्शन लेखनासाठी प्रसिद्ध असलेल्या पेठे यांनी नॉन-फिक्शनकडे वळण्यामागील प्रवास उलगडला. गेल्या वीस वर्षांत त्यांनी पुस्तक लेखन केले नसले, तरी त्या सातत्याने डायरी लेखन करत होत्या. लहानपणापासूनच डायरी लिहिण्याची सवय असल्याचे सांगताना, “हे माझ्या म्हातारपणातील मनोरंजन आहे,” असे उत्तर त्यांनी वडिलांना दिल्याची आठवण त्यांनी यावेळी सांगितली.
प्रत्येकाचे बालपण वेगळे असते, या जाणिवेतून त्यांच्या लेखनाला दिशा मिळाली, असे त्यांनी नमूद केले. दीर्घ काळानंतर पुन्हा पुस्तक लेखनाकडे वळताना डायरी लेखनाचे दस्तऐवजीकरण महत्त्वाचे ठरल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
इंग्रजी बोलण्याबाबत न्यूनगंड असल्याची कबुली देतानाच त्यांनी नाट्य क्षेत्रातील अनुभवही मांडले. नोकरी, नाटकाची तालीम आणि वेळ यांचा समतोल राखत त्यांनी लेखनाला प्राधान्य दिले. नाटकातील कामगिरीसाठी त्यांना ‘नाट्यदर्पण’ पुरस्कारही प्राप्त झाला आहे.
समाजपरिवर्तनासाठी लेखन आवश्यक असल्याचे सांगताना त्यांनी स्वतःवर लावण्यात आलेल्या ‘बोल्ड लेखिका’ या शिक्क्याबद्दल स्पष्ट भूमिका घेतली. लैंगिकतेसारख्या विषयांवर त्यांनी केवळ प्रसिद्धीसाठी नव्हे, तर सामाजिक बदलासाठी लेखन केल्याचे त्यांनी ठामपणे अधोरेखित केले.
मुलाखतीत बोलताना यावेळी त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या धाडसी कार्याचा संदर्भही दिला.
तसेच त्यांच्या ‘हंस अकेला’ या कथासंग्रहाच्या शीर्षकाविषयी बोलताना, त्या संग्रहातील कथांचा समान धागा ‘एकटेपणा’ असल्यामुळे हे शीर्षक निवडल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव देशपांडे यांनी केले. या संवादाचा साहित्यप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मनापासून आस्वाद घेतला.


























