सोलापूर – नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वाला हरताळ फासून आर्थिक प्रलोभनातून नियमबाह्य कामकाज झाल्याचा गंभीर आरोप करत, माढा तालुक्यातील चव्हाणवाडी (टें) येथील रहिवासी राहुल पोपट चव्हाण यांनी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. महाराष्ट्र दिन, १ मे २०२६ पासून त्यांनी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
उपोषणकर्त्यांनी मांडलेल्या मागण्यांनुसार, मौजे चव्हाणवाडी (टें) येथील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) शिवाजी सुभाष घाडगे तसेच टेंभुर्णी येथील तत्कालीन मंडळ अधिकारी गंगासागर कमलाकर सोनवणे यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, अशी ठाम भूमिका घेण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी आर्थिक प्रलोभन स्वीकारून नियमबाह्य निर्णय घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याशिवाय, जमीन गट क्रमांक ११६/२ व १३३/१/अ/२ या मालमत्तेबाबत गंभीर फसवणुकीचा प्रकार घडल्याचा आरोप आहे. बनावट सह्या व अंगठ्यांच्या आधारे संगनमताने जमीन परस्पर नावावर करून हडप करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित व्यक्तींवर तात्काळ गुन्हे दाखल करून सखोल चौकशी करावी, तसेच तपासाअंती दोषींवर कठोर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.
“माझ्या वहिवाटीच्या हक्काचे संरक्षण करून मला न्याय मिळावा,” अशी भावनिक मागणी करत चव्हाण यांनी आत्मदहनाचा इशारा करत प्रशासनाकडे लक्ष वेधले आहे.
या आमरण उपोषणामुळे महसूल विभागातील कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.


























