सोलापूर : आपली तक्रार/ माय सोलापूर ॲप व लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत अर्ज मुदतीत निकाली न काढल्याप्रकरणी सोलापूर महापालिकेने ५१ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली आहे. ‘संबंधितांकडून नियमानुसार दंड वसूल करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त सोनाली यादव यांनी काढले आहेत.
सोलापूर महापालिकेच्या ‘आपली तक्रार’ पोर्टल, ‘माय सोलापूर’ अॅप तसेच लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत प्रलंबित अर्जांची दखल घेत प्रशासनाने संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. मुदतीत तक्रारी व अर्ज निकाली न काढणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून नियमानुसार दंड वसूल करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिले आहेत. महापालिकेने नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण व्हावे, यासाठी ऑनलाइन तक्रार प्रणाली सुरू केली आहे. तसेच लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत १३६ सेवा अधिसूचित करण्यात आल्या आहेत. या सेवांशी संबंधित अर्ज वेळेत निकाली काढणे व पोर्टलवरील माहिती अद्ययावत ठेवण्याच्या सूचना यापूर्वीही देण्यात आल्या होत्या. मात्र अद्याप अनेक तक्रारी व अर्ज प्रलंबित असल्याचे आढळून आल्याने कारवाई केली आहे.
आपली तक्रार माय सोलापूर ॲप वर प्रकरणे प्रलंबित ठेवल्याप्रकरणी २१ कर्मचाऱ्यांना एकूण ४ हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे. लोकसेवा अधिनियम हक्क अंतर्गत अर्ज प्रलंबित ठेवल्याने ३० कर्मचारी व अधिकाऱ्यांना एकूण २५ हजार ९०० रुपये दंड करण्यात आला आहे. एकूण ५१ कर्मचारी व अधिकाऱ्यांना एकूण २९ हजार ९०० रुपये दंड आकारण्यात आला आहे.
विशेष पुनरीक्षण कामावरील
कर्मचाऱ्यांना ३१ जुलैपर्यंत दिलासा
दरम्यान, विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांवरील ‘आपली तक्रार’ पोर्टल व लोकसेवा हक्क अधिनियमातील प्रलंबित प्रकरणांसंदर्भातील दंडात्मक कारवाई ३१ जुलै २०२६ पर्यंत स्थगित ठेवण्यात आली आहे. संबंधित विभागप्रमुखांनी या आदेशानुसार पुढील कार्यवाही करावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
Post Views: 9