बार्शी – सातारा हिल मॅरेथॉन २०२६ मध्ये बार्शी रनर्सच्या तब्बल ३८ धावपटूंनी सहभाग नोंदवत २१ कि.मी. अंतराची मॅरेथॉन यशस्वीरीत्या पूर्ण केली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल बार्शी रनर्स व बार्शी सायकलिंग क्लबच्यावतीने शिवशक्ती मैदान, बार्शी येथे सर्व धावपटूंचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.
विविध वयोगटातील धावपटूंनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत निर्धारित २१ कि.मी. अंतर यशस्वीरीत्या पूर्ण केले. धावपटूंच्या या कामगिरीमुळे बार्शी शहरातील रनिंग व फिटनेस चळवळीला निश्चितच बळ मिळाले आहे.
याप्रसंगी १००० कि.मी. बीआरएम सायकलिंग अवघ्या ७३ तासांत पूर्ण केल्याबद्दल सायकलिस्ट निलेश सरवदे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच सातारा हिल मॅरेथॉन २१ कि.मी. अंतर दोन तासांच्या आत, १ तास ५८ मिनिटांत पूर्ण केल्याबद्दल युवराज करळे यांचा विशेष गौरव करण्यात आला.
सत्कार समारंभास नागपूरचे उपजिल्हाधिकारी उमेश चव्हाण, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे जयकुमार उर्फ बापू शितोळे, बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे पीएसआय आबासाहेब शिरगिरे, कुलदीप सोनटक्के, सेकंडरी स्कूल एम्प्लॉयी सोसायटीचे संचालक प्रमोद देशमुख तसेच बार्शी सायकलिंग क्लबचे अध्यक्ष चंद्रकांत उर्फ बप्पा बारबोले यांची प्रमुख उपस्थिती होती.
मान्यवरांच्या हस्ते सातारा हिल मॅरेथॉन पूर्ण करणाऱ्या सर्व ३८ धावपटूंचा सत्कार करण्यात आला.
बार्शी शहर व परिसरामध्ये धावणे, सायकलिंग, फिटनेस आणि निरोगी जीवनशैलीची चळवळ अधिक व्यापक करण्याच्या उद्देशाने बार्शी रनर्स व बार्शी सायकलिंग क्लबच्या माध्यमातून विविध उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. या उपक्रमातून अनेक नागरिकांना नियमित व्यायाम व क्रीडा क्षेत्राकडे वळण्यास प्रेरणा मिळत आहे.
Post Views: 5