सोलापूर : नभांगणाहून नटले भुवन, पुनवेचेही गेले मी पण ! चंद्र लाजला लपु लागला, असा सोहळा भुमीवरी आजला ! दीप मंडपी झगझगणारे, या तेजाने दिपले सारे ! म्हणती खाली पाहू नका रे ! आड ढगाच्या लपले सारे
बिजली बाईला हेवा वाटला ! असा भीम जन्माचा सोहळा !! अगदी याच प्रमाणे सोलापूर शहरात भीम जयंती सप्ताहास उत्साही वातावरणात मध्यरात्रीपासून प्रारंभ झाला. मध्यरात्रीपासूनच प्रज्ञासूर्यास अभिवादनासाठी जनसागर लोटला होता.
विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर शहरात विविध शेकडो मंडळांच्या वतीने मध्यरात्री 12 वाजता डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना सजवलेल्या आकर्षक अशा मंडपामध्ये करण्यात आली. त्रिशरण, पंचशील सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन अभिवादन करण्यात आले. शहरात विविध भागांमध्ये विद्युत रोषणाईचा लखलखाट दिसून आला. “जय भीम”च्या गगनभेदी घोषणा देण्यात आल्या.
मनोभावे जनसागर झाला नतमस्तक !
महिलांसह अबाल वृद्ध अनुयायांचे जथेंच्या जथें विश्व भूषण डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी मध्यरात्रीपासूनच येत होते. “बोलो रे बोलो, जय भीम बोलो”, “ताकत से बोलो, जय भीम बोलो”, “हिम्मत से बोलो, जय भीम बोलो”, “जोर से बोलो, जय भीम बोलो” असा नारा देत हातात निळा झेंडा घेऊन भीम अनुयायी डॉक्टर आंबेडकर चौकाकडे येत होते. डॉक्टर आंबेडकर चौक येथील त्यांच्या पुतळ्यास मनोभावे जनसागर नतमस्तक झाला. निळ व गुलालांची मुक्त उधळण करण्यात आली. उत्साही वातावरणात भीम जयंती सप्ताह प्रारंभ झाला.
दरम्यान, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती विश्वस्त व उत्सव समितीच्या वतीने
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मध्यरात्री 12 वाजता अभिवादन करण्यात आले. मध्यवर्ती महामंडळाचे पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्ते आणि अबालवृद्ध भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावर्षी दिनांक 14 ते 19 एप्रिल यादरम्यान भीम जयंती सप्ताह साजरा करण्यात येत आहे. रविवार दि. 19 एप्रिल 2026 रोजी भीम जयंती सप्ताहाची भव्य अशा विराट मिरवणुकीने सांगता होणार आहे. सुमारे 450 मंडळांनी आकर्षक सजवलेल्या व विद्युत रोषणाईने नटलेल्या मंडपामध्ये डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना मध्यरात्री केली.
मिलिंद नगरात आतिष बाजी कार्यक्रम
मिलिंद नगर येथील भीमशक्ती सेना तरुण मंडळाच्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदाही अतिशबाजीचा कार्यक्रम पार पडला. हे शोभेचे दारू काम पाहण्यासाठी महिलांसह आबालवृद्धांनी मोठी गर्दी केली होती.गेल्या 35 वर्षापासून हा आतिषबाजीचा सोहळा आयोजित करण्यात येतो. आज मध्यरात्री मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली. त्यानंतर आतिषबाजीचा कार्यक्रम पार पडला. विविध प्रकारचे शोभेचे दारू काम पाहून भीम अनुयायी मंत्रमुग्ध झाले.. डोळे दीपवणारे मनोहारी आतिषबाजी पाहायला मिळाली. हलगीच्या कडकडाटाच “जय भीम” चा जयघोष करत हा सोहळा पार पडला. यावेळी मार्गदर्शक विशाल माने, आतिश बनसोडे, अध्यक्ष गौरव कांबळे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाच्या वतीने मध्यरात्री प्रतिमेची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्रिशरण पंचशील सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
























